देशप्रभू मृत्यूप्रकरणी ‘सीएमओ’ची चौकशी

dainik gomantak
मंगळवार, 12 मे 2020

देशप्रभू यांना आपत्कालीन कक्षात उपचारासाठी आणण्यात आले, त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेले सीएमओ यांना गेल्या आठवड्यात समितीने नोटीस पाठवून आज (११ मे) चौकशीस उपस्थित राहण्यात सांगण्यात आले होते.

पणजी,

गोमेकॉ इस्पितळात उपचारार्थ दाखल केलेल्या पेडण्याचे आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्यावर डॉक्टरांनी उपचार करण्यात केलेल्या दिरंगाईमुळे त्रिसदस्यीय समितीमार्फत आज काही डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्या जबान्या नोंद करण्यात आल्या. यामध्ये २१ एप्रिलच्या दिवशी आपत्कालीन कक्षाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांची चौकशी करण्यात आली व इतरांच्या जबान्या नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली. 
देशप्रभू यांना आपत्कालीन कक्षात उपचारासाठी आणण्यात आले, त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेले सीएमओ यांना गेल्या आठवड्यात समितीने नोटीस पाठवून आज (११ मे) चौकशीस उपस्थित राहण्यात सांगण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सिटी स्कॅनमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे देशप्रभू यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याचा कथित ठपका ठेवून ही चौकशी सुरू आहे. आपत्कालिन कक्षातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदविण्यास सुरवात झाली आहे. जितेंद्र देशप्रभू यांची आपत्कालीन कक्षात प्राथमिक तपासणी केल्यानंतर अधिक निदान करण्यासाठी त्यांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. हा सल्ला देण्यामागे कोणती कारणे होती व देशप्रभू यांना प्राथमिक काय उपचार करण्यात आले होते याची माहिती जमा केली जात आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, काही डॉक्टर कोविड - १९ चे रुग्ण असल्याचा संशय आल्यास उपचार करताना हातही लावत नाहीत. असाच प्रकार या कक्षामध्ये घडला होता की काय याचीही चौकशी सुरू आहे. 
दरम्यान, निलंबित करण्यात आलेली वरिष्ठ निवासी महिला डॉक्टर ही रुग्ण सिटी स्कॅन विभागात आणण्यापूर्वीच निघून गेलेली होती व तिच्यासोबत असलेले कनिष्ठ डॉक्टर्स व टेक्निशियनही तेथून गेले होते. देशप्रभू यांची कोविड - १९ ची चाचणी अहवाल यायचा बाकी होता त्यामुळे त्यांना सिटी स्कॅनसाठी पाठविण्यात आले होते. आपत्कालीन कक्षामध्ये त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करताना तपासणी झाली होती का असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. आपत्कालीन कक्षामध्ये हा प्रकार देशप्रभू यांच्या बाबतीत घडल्याने त्याची चौकशी सुरू झाली आहे. मात्र सामान्य रुग्णांच्या बाबतीत असे आपत्कालीन कक्षात तसेच सिटी स्कॅन विभागात घडत असते. अनेकवेळा हे डॉक्टर अधुनमधून ब्रेक घेतात किंवा गायब होतात व अर्धा ते एक दिवस परततच नाहीत. मात्र, सामान्य रुग्ण डॉक्टरांच्या तक्रारी करू शकत नाही. तक्रार केल्यास डॉक्टरकडून तपासणीवेळी वाईट वागणूक मिळण्याची भीती असते. 

 

संबंधित बातम्या