पतसंस्थेसह, आयुर्वेदिक चिकित्सालय फोडले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

डिचोली शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेसह आयुर्वेदीक चिकित्सालय मिळून एकाच रात्री दोन आस्थापने फोडण्याची घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.

डिचोली : डिचोली शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेसह आयुर्वेदीक चिकित्सालय मिळून एकाच रात्री दोन आस्थापने फोडण्याची घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.  चोरीच्या या घटना काल मध्यरात्री घडल्याचा अंदाज आहे. दीनदयाळ भवन इमारतीत कार्यरत असलेल्या दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान संचलीत आयुर्वेदीक चिकीत्सा केंद्र चोरट्यांनी फोडले.

मात्र या दोन्ही चोऱ्यात चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागले नाही. चोरट्यांनी पतसंस्थेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या चोरीत दोन्ही आस्थापनातील रोकड तसेच मॉडेम आणि डीव्हीआर मिळून जवळपास २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात चोरट्यांना यश आल्याची माहिती मिळाली आहे. दीनदयाळ इमारतीच्या मागील बाजूने खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला. चोरट्यांनी दीनदयाळ पतसंस्थेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. रोख अडीच हजार रुपये मात्र चोरट्यांच्या हाती लागले. चोरट्यांनी याच इमारतीत असलेल्या आयुर्वेदिक चिकीत्सालयातही चोरी करुन आतील रोख साडे सहा हजार रुपये लंपास केले. आज सकाळी झाडूवाली येवून तिने नेहमीप्रमाणे साफसफाई करुन ती निघून गेली. तिच्या लक्षात चोरीचा प्रकार आला नाही. मागाहून पतसंस्थेची एक महिला कर्मचारी आली असता, तिच्या लक्षात हा प्रकार आला. या घटनेची माहिती मिळताच, दीनदयाळ पतसंस्थेचे व्यवस्थापक विश्वास गावकर यांनी पोलिसांना कळवले. डिचोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन, ठसेतज्ञ आणि श्‍वान पथकाला पाचारण करुन चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला. 

‘डीव्हीआर’ पळवले..!
दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेसह आयुर्वेदीक चिकीत्सालयात सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी या दोन्ही आस्थापनातील सीसी टिव्हीचे डीव्हआर (रेकॉर्डर) आणि मॉडेम पळवला. महत्वाचा दुवा ठरु शकणाऱ्या सीसी टिव्ही कॅमेरे यंत्रणेचे डीव्हआर आणि मॉडेम पळवल्याने तपासकामात अडथळा निर्माण झाला आहे. पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर यांनी चोरीचा पंचनामा केला. पोलिसांनी तपासाला गती दिली असून, ते वेगवेगळ्या मार्गाने तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या