मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी घटली

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सागरमाला प्रकल्पांतर्गत मुरगाव बंदरातील माल हाताळणी वाढणार, असे गृहीत धरण्यात आले होते. माल हाताळणी २०१९-२० मध्ये ४२.१ दशलक्ष मेट्रिक टन होईल असे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षातील माल हाताळणी १६.०२ दशलक्ष मेट्रिक टन झाली. यामुळे सागरमालाचे केवळ ३८ टक्के लक्ष्यच मुरगाव बंदराने गाठल्याचे सिद्ध झाले आहे.

पणजी :  सागरमाला प्रकल्पांतर्गत मुरगाव बंदरातील माल हाताळणी वाढणार, असे गृहीत धरण्यात आले होते. माल हाताळणी २०१९-२० मध्ये ४२.१ दशलक्ष मेट्रिक टन होईल असे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षातील माल हाताळणी १६.०२ दशलक्ष मेट्रिक टन झाली. यामुळे सागरमालाचे केवळ ३८ टक्के लक्ष्यच मुरगाव बंदराने गाठल्याचे सिद्ध झाले आहे.

मुरगाव बंदरातून कोळसा वाहतूक वाढेल अशी भीती पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. वास्कोतील दररोज कोळसावाहू शंभर रेल्वे निघतील, असेही सांगण्यात येत आहे. काहीजण तर गोव्यापासून आठशे किलो मीटरवरील औष्णिक प्रकल्पात जाळल्या जाणाऱ्या कोळशाची भुकटी गोव्यात येण्याची शक्यता वर्तवत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुरगाव पोर्ट ट्रस्टकडे उपलब्ध आकडेवारीची पडताळणी केली असता २०१४-१५ मध्ये  १.९ दशलक्ष मेट्रिक औष्णिक कोळसा मुरगाव बंदरात उतरवण्यात आला. त्याची हाताळणी वाढून २.६ दशलक्ष मेट्रिक टन ती होईल असा एमपीटीचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १.५५ दशलक्ष मेट्रिक टन औष्णिक कोळसा उतरवण्यात आला. यामुळे कोळसा हाताळणी वाढण्याऐवजी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुरगाव बंदरात २०१४-१५ मध्ये ६.६ दशलक्ष मेट्रिक टन उतरवण्यात आला होता. त्याचे प्रमाण १४ दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत जाण्याचा एमपीटीचा अंदाज होता. मात्र २०१९-२० मध्ये प्रत्यक्षात ७.९४ कोळसाच उतरवण्यात आला. केवळ कोळसाच नव्हे, तर इतर मालाची हाताळणीही मुरगाव बंदरात घटली आहे. पीओएल उत्पादनांची या बंदरातील हाताळणी १ दशलक्ष मेट्रिक टन असेल, असे गृहीत धरले तरी ही हाताळणी प्रत्यक्षात ०.६५ दशलक्ष मेट्रिक टन होती. रसायने ०.७ दशलक्ष मेट्रिक टन हाताळणी जातील असे वाटत होते मात्र  त्याचं प्रमाण केवळ ०.१६ दशलक्ष मेट्रिक टन होते. कोकची हाताळणी प्रस्तावित १ दशलक्ष मेट्रिक टनांऐवजी ०.०८ दशलक्ष मेट्रिक टनांचीच झाली आहे.  लोह खनिजाची हाताळणी ८ दशलक्ष मेट्रिक टनांऐवजी १.७२ दशलक्ष मेट्रिक टनांची झाली. पोलादाची हाताळणी २.४ दशलक्ष मेट्रिक टनांऐवजी १.२२ दशलक्ष मेट्रिक टन एवढीच झाली आहे. खतांची हाताळणी ०.५ दशलक्ष मेट्रिक टनांऐवजी ०.०५ दशलक्ष मेट्रिक टन एवढीच झाली. 

उत्पन्न वाढूनही तोटा
मुरगाव बंदराला माल हाताळणीतून ४३१.१७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तरी या आर्थिक वर्षात ७.४७ कोटी रुपये तोटा झाला आहे. माल हाताळणीचा खर्च २४६.३२ कोटी रुपये होता तर इतर वित्तीय जबाबदारी २१४.८६ कोटी रुपयांची होती. त्यामुळे २०१७-१८ मध्ये एमपीटीचे उत्पन्न ४२५.६७ कोटी रुपये असूनही २.२१ कोटी रुपये नफा झाला होता. आता उत्पन्न वाढूनही तोटा झाला आहे.

संबंधित बातम्या