"जनतेने कॉंग्रेस नेत्यांच्याच तोंडाला कोळसा फासावा"

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

कॉंग्रेस हा केवळ प्रसिद्धीच्या मागे लागलेला पक्ष आहे. त्यामुळे कार्यक्रम, आंदोलने करून प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. सरकारला विरोध करायचा म्हणजे प्रसिद्धी मिळेल असे त्यांना वाटते. त्याचमुळे मुठभर कॉंग्रेसचे कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसते.

पणजी : कोळसा कॉंग्रेसने गोव्यात आणला. आज तेच कोळशाला विरोध करत फिरत आहेत. जनतेने कॉंग्रेस नेत्यांच्याच तोंडाला कोळसा फासावा, असे व्यक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी (गुरुवारी) पत्रकार परिषदेत काढले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष अनिल व प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते.

तानावडे म्हणाले, कॉंग्रेस हा केवळ प्रसिद्धीच्या मागे लागलेला पक्ष आहे. त्यामुळे कार्यक्रम, आंदोलने करून प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. सरकारला विरोध करायचा म्हणजे प्रसिद्धी मिळेल असे त्यांना वाटते. त्याचमुळे मुठभर कॉंग्रेसचे कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसते.
ते म्हणाले, कॉंग्रेसकडे नेते, कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळे काणकोणमधील कार्यक्रमांनाही तेच कार्यकर्ते तर पेडण्यातील कार्यक्रमासही तेच कार्यकर्ते असे चित्र दिसते. आंदोलनांचेही तेच. तेच तेच कार्यकर्ते राज्यभर फिरत असतात. त्यांना राज्यभरात कार्यकर्ते नाहीत.

त्यामुळे असलेल्या अवघ्याच कार्यकर्त्यांना राज्यभर फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. देशभर कॉंग्रेस रोडावत चालली असताना राज्यात ती आक्रसत चालली आहे. कॉंग्रेसकडे नवा कार्यकर्ता येत नाही. ते फक्त हवा निर्माण करत आहेत. जनता त्यांच्यासोबत नाही याची जाणीव त्यांना नाही.
कॉंग्रेसचे सरकार केंद्रात व राज्यात असताना कोळसा वाहतूक सुरू झाली आहे. ते वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून भाजपवर वार करू पाहत आहे.

लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या विरोधात आधीच सुरू असलेल्या आंदोलनात घुसून कॉंग्रेस आपले झेंडे फडकावू पाहते. लोकांनी त्यांचे झेडे खाली करायला लावले आहे. लोहमार्ग दुपदरीकरण फ्रान्सिस सार्दिन पूर्वी खासदार असताना त्यांनी मंजूर करून आणले होते. तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत त्यांचे अभिनंदन केले होते. दोघेही आज सोयीस्करपणे विसराळूपणाचे ढोंग करीत आहेत. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. पक्षाचा त्यांना ठाम पाठींबा आहे. कॉंग्रेसच्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही. जे आज काही प्रश्न दिसत आहेत ते कॉंग्रेसनेच निर्माण केलेले आहेत. जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपलाच जनता पसंती देईल. भाजप आणि जनता यांच्यात दरी निर्माण झालेली नाही. आम्ही सातत्याने जनतेच्या संपर्कात आहोत. कॉंग्रेस प्रसिद्धीच्या मागे आहे तर आम्ही विकास करण्याचा ध्यास घेऊन वावरत आहोत.

देशभरात भाजपची चमकदार कामगिरी
बिहारमध्ये भाजप आघाडीचे सरकार पुन्हा येणार आहे. तेथील सर्व नेत्यांचे अभिनंदन. तेथील जनतेने पाच वर्षांनी पुन्हा विश्वास दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासावर हे शिक्कामोर्तब आहे. प्रदेश पक्ष समितीच्या वतीने पंतप्रधान, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल यांचे मी अभिनंदन करत आहे. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांतही भाजपने चमकदार कामगिरी केली आहे. ५७ पैकी ४० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या