सागरी महामार्ग गोव्यातही विस्तारणार का?

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

मध्यंतरी पेडणे तालुक्यातील चोपडे ते केरीपर्यंतचा रस्ता चौपदरी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सागरी महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार अशी माहिती त्यावेळी देण्यात येत होती. मात्र मांद्रेच्या पुढे हा रस्ता होऊ शकला नाही.

पणजी

महाराष्ट्र सरकारने रेवस ते रेडी या किनारी महामार्गाला पुन्हा चालना देण्याचे ठरवले असल्याने गोव्यातही किनारी महामार्गाचा विस्तार होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नितीन गडकरी यांनी हा महामार्ग गोव्यात विस्तारला जाईल, तेरेखोल ते पोळे सागरी महामार्ग बांधला जाईल, अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. तेच आता केंद्रीय महामार्गमंत्री असल्याने गोव्यातील विस्ताराबाबत केंद्र सरकार महत्त्वाची भूमिका बजावणार का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मध्यंतरी पेडणे तालुक्यातील चोपडे ते केरीपर्यंतचा रस्ता चौपदरी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सागरी महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार अशी माहिती त्यावेळी देण्यात येत होती. मात्र मांद्रेच्या पुढे हा रस्ता होऊ शकला नाही. रस्ता रुंदीकरणास स्थानिकांनी केलेला विरोध आणि जागेची अनुपलब्धता या कारणांमुळे चोपडेहून सुरू झालेले रस्ता रुंदीकरण मांद्रे येथे जाऊन थांबले.
महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी या रस्त्याचे काम हाती घेतले होते. काही टापूत ते पूर्णही झाले आहे. मात्र ते काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे आता तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला गती देण्याचे ठरवण्यात आले आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ रुंद करण्यात येत असतानाच त्याला समांतर असा दुसरा रस्ता आकाराला आणण्यात येणार आहे.
गोव्याच्या किनारी भागातून हा रस्ता नेणे कठीण होणार होते. हॉटेलांची गर्दी आणि दाट लोकवस्ती यामुळे या सहा पदरी रस्त्यासाठी जागाच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे गोव्यात उन्नत रस्ता या प्रकारे या रस्त्याचे बांधकाम करण्याचा विचार पुढे येऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. अद्याप याबाबत काहीही अधिकृतपणे समजलेले नाही अशी गोवा सरकारची आजच्या घडीची भूमिका आहे.
गोवा सरकारने नव्या प्रकल्पांचे काम हाती घ्यायचे नाही असे ठरवले असले तरी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने साकार होणाऱ्या प्रकल्पांना ही बंदी लागू नाही. त्यामुळे रेवस ते रेडी महामार्ग पोळेपर्यंत विस्तारला जाऊ शकतो. गेली ९ वर्षे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हद्दीत रेंगाळला आहे. कोकणात नदी, नाल्यांवर अनेक पूल बांधणे हीच या प्रकल्पासमोरील मोठी अडचण आहे.

संबंधित बातम्या