हरमल येथे १.३२ लाखांचे कोकेन जप्त

विलास महाडिक
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

नायजेरियनला अटक, अंमलीपदार्थविरोधी पोलिसांची कारवाई

पणजी

पेडणे तालुक्यातील हरमल येथे काल संध्याकाळी संशयास्पदरित्या फिरत असताना अंमलीपदार्थविरोधी पथकाने नायजेरियन सोपोरूची नेवेदिन मोसेस (वय २७) याला अटक केली. त्याच्याकडून गांजा व कोकेन जप्त केले. या अंमलीपदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे १ लाख ३२ हजार रुपये असल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या कक्षाचे पोलिस निरीक्षक सुदेश वेळीप आपल्या पथकासह किनारपट्टी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी हरमल येथे एक नायजेरियन नागरिक संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांना पाहून तो बिचकला व तो पळू लागला. तो अंमलीपदार्थ विकण्यासाठी ग्राहक शोध असण्याची शक्यता आहे असा अंदाज घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन केलेल्या तपासणीत त्याच्याजवळ ५१० ग्रॅम गांजा व ८.१९५ कोकेन सापडले. हा अंमलीपदार्थ एका सीलबंद केलेल्या पिशवीत त्याने लपविला होता. त्याला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी न्यायालयाने पोलिस कोठडीत आहे.
दरम्यान, अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने या गस्तीवेळी आणखी एका आफ्रिकन नागरिक जॉन उझ्मा (३८ वर्षे) याला ताब्यात घेऊन त्याचीही झडती घेतली होती. मात्र, त्याच्यावजळ अंमलीपदार्थ सापडला नाही. त्याच्या पासपोर्टची चौकशी केली असता त्याचा भारतातील वास्तव्याचा व्हिसा संपूनही तो बेकायदेशीर राहत होता. याप्रकरणी त्याला विदेशी क्षेत्रीय नोंदणी विभागाकडे (एफआरआरओ) सुपूर्द करण्यात आले. या विभागाने त्याची रवानगी म्हापसा येथील नजरकैद केंद्रात केली आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या