क्‍वारंटाईन व्‍यक्तीचा सहकारी फिरतोय बाजारात

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

सांगे परिसरात घबराट : सरकारी चिठ्ठीमुळे पोलिसांवरही मर्यादा

सांगे

कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना संशयित पर्यटकांना सरकार आता थेट आपल्या घरात क्वारंटाईन होण्‍यासाठी सल्ला देऊ लागले आहे. त्‍यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असताना सांगे शहरात राज्यस्थान व्हाया दिल्ली मार्गे रेल्वेतून थेट गोवा असा प्रवास करून दोन दिवस मडगावात क्वारंटाईन केलेल्या संशयिताला आपल्या घरात राहण्याचा आदेश देऊन पाठविण्यात आले. सरकारचा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी विश्वनाथ नार्वेकर यांनी व्यक्त केल्या आहे.
दोन दिवसांपूर्वी सांगेत दाखल झालेली व्‍यक्ती जयपूर - दिल्ली असा प्रवास करून आली असताना त्याला चौदा दिवस क्वारंटाईन करून ठेवणे आवश्यक असताना दोन दिवसांत सांगेत पाठविण्यात आले. सांगेत त्याचे स्वतःचे स्वतंत्र घर नसून तो भाडोत्री खोलीत राहतो. सरकारच्या म्हणण्यानुसार तो आपल्या खोलीत सुरक्षित राहणार. पण, तसे न होता त्याच खोलीत राहणारा त्याचा एक साथीदार दररोज आपल्या दुकानात ये - जा करीत आहे. खोलीत असलेल्या व्यक्तीला काय हवे, काय नको, तसेच त्‍याची काळजी घेणारा त्‍याचा साथीदार मात्र दिवसभर बाजारात फिरत असतो. जर क्वारंटाईन केलेली व्‍यक्‍ती संशयित जर पॉझिटिव्‍ह झाली, तर त्‍याच्‍या सहकाऱ्यामार्फत बाजारपेठेत संपर्कातील लोकांनाही कोरानाची लागण होऊ शकते. त्‍यामुळे सांगे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
जर आठ ते दहा दिवसांत क्‍वारंटाईन केलेली व्‍यक्‍ती कोरोना पॉझिटिव्‍ह झाली, तर त्‍याच्‍या हलगर्जीपणाची किंमत स्थानिकांना विनाकारण भोगावी लागणार आहे. पोलिसांना सांगितल्यावर त्या व्‍यक्तीकडे सरकारने दिलेली चिठ्ठी आहे, असे सांगण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ सरकारने चिठ्ठी दिली, तर पुढील शिल्लक दिवसांत त्याला काहीही होणार नाही, याची हमी सरकार त्या चिठ्ठीतून देत आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्यांची स्वतःची घरे नाहीत, भाडोत्री खोलीत राहणार आणि त्यांची काळजी घेणारे बाजारात फिरणार याला क्वारंटाईन म्हणावे की, सरकारचा हलगर्जीपणा? याचा वेळीच विचार होणे आवश्यक आहे. उद्या काही विपरीत घडल्यास त्‍याला जबाबदार कोण? असा प्रश्‍‍न विश्वनाथ नार्वेकर यांनी उपस्‍थित केला आहे.

संबंधित बातम्या