Republic Day 2023: कथा सक्तीच्या वर्गणीची

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1 हजार रुपयांची वर्गणी गोळा करा, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
Republic Day 2023 |Money
Republic Day 2023 |MoneyDainik Gomantak

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1 हजार रुपयांची वर्गणी गोळा करा, असा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी जारी केलेला आदेश व्हायरल झाला आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या चर्चेला पेव फुटले.

आता जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी त्यावर खुलासा केला असला तरी असा वर्गणी गोळा करण्याचा प्रकार यापूर्वी कधी झाल्याचे कुणाच्या ऐकिवात नव्हते.

मात्र, काही जणांनी या फतव्याचे स्वागत करताना, नाही तरी हे सरकारी कर्मचारी लोकांकडून चिरीमिरी घेऊन आपलीच तुंबडी भरतात. त्यांच्याकडून फक्त 1 हजार काढून घेतले तर त्यात चुकले काय, अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Republic Day 2023 |Money
Road Accident: कुंकळ्ळी येथे अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू

राजकारणात सारेच माफ!

आपल्या पंचायत तथा उद्योगमंत्र्यांना इतक्या वर्षांनी राजकारण म्हणजे काय ते कळले, असे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरून कुणालाही वाटेल. पण प्रत्यक्षात तसे नाही. मूळ कॉंग्रेसजन तसेच एदुआर्दबाबांचे उजवे हात असलेल्या माविन गुदिन्हो यांनी खरे तर नव्वदच्या दशकात आपला खरा रंग दाखवला होता.

त्यावेळचा ‘जीपीपी’चा प्रयोग फसला व इतरांसमवेत ते काँग्रेसमध्ये परतले आणि मंत्रीही झाले. वीज सबसिडी घोटाळा तो त्याच काळचा आणि तो त्यांची अजूनही पाठ सोडत नाही. आज ते भाजपमध्ये, तेही मंत्रिपदी आहेत.

त्यांनी युध्दात, प्रेमात व निवडणुकीत सर्व काही माफ असते, असे म्हादईसंदर्भात म्हटले आहे; पण ते राजकारणाचा उल्लेख करायला विसरले. कारण अशा राजकारणानेच त्यांना वेळोवेळी हात दिला आहे.

Republic Day 2023 |Money
Goa Police: आभिमानास्पद ! गोवा पोलिसांना एकाचवेळी चार राष्ट्रपती पदके

इथे आत्मनिर्भरपणा अजिबात नको!

म्हादई प्रश्‍नावरून कर्नाटक आणि गोवा या राज्यांत वाद पेटला असला तरी म्हादई प्रकरण जे खाते हाताळते, त्या खात्याचा मुख्य अधिकारी हा कर्नाटकीच असल्याचे सांगितले जाते. वास्तविक हा अधिकारी कधीचाच निवृत्त झाला आहे; पण तरीही त्याला एक्स्टेंशन देऊन कामावर ठेवले आहे, असे सांगण्यात येते.

यापूर्वीही त्याच्याकडे बरीच महत्त्वाची खाती होती. या पदावर निवृत्त झालेल्या मूळच्या कर्नाटकी अधिकाऱ्याला ठेवण्याऐवजी एका सक्षम अशा गोमंतकीय अधिकाऱ्याची नियुक्ती का केली जात नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एरव्ही सर्वच बाबतीत गोवा आत्मनिर्भर व्हावा, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग येथेच ही आत्मनिर्भरता कुठे बरी पेंड खाते, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

काणी काणी कातवा, म्हातारेच्या नातवा!

‘काणी काणी कातवा, म्हातारेच्या नातवा’, खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट अशी सुरवात करीत आपण आपल्या म्हाताऱ्या माणसांकडून अनेक कथा कहाण्या ऐकल्या असतील. कोकणी नाटककार राजदीप नाईक यांनी ‘काणी नव्या युगाची’ हे कोकणी नाटक रंगमंचावर आणले आहे.

हे नाटक नव्या शिक्षण धोरणावर आधारित असल्याचा दावा केला जातो, तर काही जाणकार हे नाटक ‘तारे जमीन पर’ या पठडीतील असल्याचे सांगतात.

या नाटकाचे प्रयोग 12 तालुक्यांत सादर करण्यासाठी राजदीप नाईक यांना सरकारने दिलेले कंत्राट मागे घेतल्यामुळे वाद सुरू झाला आहे. यात राजकारण असल्याचा आरोप केला जात आहे.

सोशल मीडियावर फॉर आणि अगेन्स्ट कमेंट व्हायरल होत आहेत. राजदीपबाब आपण हे नाटक रेकॉर्ड करून युट्यूब वर का अपलोड करत नाहीत? अशी मागणी नेटिझन्स करू लागले आहेत.

जेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’वरून वाद झाला होता, तेव्हा ‘आप’ने अशीच मागणी केली होती. आजची पिढी बरीच शहाणी झाली आहे. कुठे चिमटा काढावा, हे त्यांना चांगलेच जमते.

अर्धे तुला, अर्धे मला

‘डबल इंजिन सरकार’ म्हणून शेखी मिरविणारे सरकार जनतेला लुटणारे सरकार बनले असल्याची जनतेची भावना झाली आहे. राज्यात मोठमोठे इव्हेंट साजरे करताना कोणतेही ताळतंत्र न राखता ‘अर्धे तुला, अर्धे मला’ करून जनतेचा पैसा अक्षरशः दिवसाढवळ्या लुटले जात आहे.

कारण नियोजनाआधीच कंत्राटदार कामाला लागतो आणि जनतेच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी टेंडर काढतात. या काळ्या कृत्यांचा पाढा वाचण्याचे काम विरोधी पक्षाने करायचे असते.

पण आज राज्यात सक्षम विरोधक नसल्याने लुटारू सरकारचे आयतेच फावले आहे. सत्तेच्या लालसेने जनतेच्या मनात आशा निर्माण केलेले आज पूर्णपणे फसलेले आहे.

‘ना घर का ना घाट का’ अशी केविलवाणी परिस्थिती जनतेची झाली आहे. सामान्य नागरिक आवाज करू लागल्यास त्यांची गळचेपी कशी करावी, हे सत्ताधारी पक्षाकडून शिकावे. फसवे मायाजाल निर्माण करून केवळ उदो उदो करणाऱ्यांना पाच हजारांच्या योजनेचा लाभ दिला की, हे मोकळे.

आता प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवावा, अशी मागणी खेड्या-पाड्यातील जनता करू लागली आहे.

Republic Day 2023 |Money
Quepem Municipality: केपे नगराध्यक्षांना हटवण्याची विरोधकांकडून जोरदार मागणी कारण...

रवींचे दर्शन कधी होणार?

भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हे गोव्यात कधी येणार, याची उत्सुकता भाजपला नव्हे, तर विरोधकांना झाली आहे. कारण रवी कधी येतील आणि त्यांना म्हादई विषयावर पत्रकार प्रश्न विचारतील, अशी अपेक्षा विरोधी पक्षाला असणे काही चुकीचे नाही.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ते आले आणि प्रभारी म्हणून नियमित पक्षीय कामाची ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु आता कर्नाटकात विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. तेथे भाजप म्हादईचे पाणी वळवणारच, अशी भूमिका घेऊन प्रचार करीत आहे.

अशा अटी-तटीच्या वेळी गोव्यात जाऊन पक्षाला अडचणीत टाकू नका, असा संदेश त्यांना नेतृत्वाने दिला असेल. त्यामुळेच ते गोव्यात येण्याचे धाडस करत नसावेत, अशी वदंता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com