जिल्हाधिकाऱ्याने घेतली पर्वरीत जाळलेल्या कचऱ्याची दखल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

वेळ सकाळची, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर एक व्हॉटसॲप संदेश येतो. त्यानंतर पर्वरीत कुठे कचरा जाळला गेला हे शोधण्यासाठी दोन उपजिल्हाधिकारी, दोन मामलेदार, तलाठी अशी फौज कामाला लागते. शेवटी कचरा जाळणारा काही सापडत नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदेशाची घेतलेली दखल चर्चेचा विषय ठरली.

पणजी : वेळ सकाळची, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर एक व्हॉटसॲप संदेश येतो. त्यानंतर पर्वरीत कुठे कचरा जाळला गेला हे शोधण्यासाठी दोन उपजिल्हाधिकारी, दोन मामलेदार, तलाठी अशी फौज कामाला लागते. शेवटी कचरा जाळणारा काही सापडत नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदेशाची घेतलेली दखल चर्चेचा विषय ठरली.

माजी माहिती आयुक्त ज्युईनो डिसोझा यांचे पर्वरीत निवासस्थान आहे. त्यांच्यासमोरच पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचेही कार्यालय आहे. त्‍या परिसरात उघडपणे कचरा जाळण्याचा प्रकार काहीजण करत होते. सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या डिसोझा यांना त्या धुराचा त्रास होत होता. त्यांनी अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांना या साऱ्याची कल्पना व्हॉटसॲपवर दिली. त्यांनी लागलीच दखल घेत तो संदेश आहे तसा अक्षय पोटेकर व मामू हागे या उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवला.

जिल्हाधिकाऱ्यांनी कचरा जाळणे बंद करा असा आदेश दिल्यावर महसूल यंत्रणा कामाला लागली. मामलेदार, गटविकास अधिकारी आणि पोलिसांना कचरा जाळणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश जारी झाले. सारी सरकारी यंत्रणा पर्वरीत कचरा कोण जाळतो याची चौकशी करू लागली. एक दोन ठिकाणी जळालेला कचरा पाहून शेजाऱ्यांकडे विचारणाही करण्यात आली मात्र कचऱ्याला आग कोणी लावली याची जबाबदारी कोणी स्वीकारली नाही.

पर्वरी परिसरातील पंचायती घरोघर कचरा संकलन करतात. तरीही काहीजण कचरा साठवून आपल्या परिसरात त्याला आग लावतात. याविषयी डिसोझा यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, पर्वरी परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विशेषतः तंदुरी विक्री करणारेही आहेत. त्या तंदूर भट्टीतून कार्बन मोनाक्साईड हवेत जातो. तो मानवी शरीरास अपायकारक आहे. जाळण्यात येणाऱ्या प्लास्टीकच्या कचऱ्यातून डाय ऑक्सेन फ्युरेन हा विषारी वायू बाहेर पडतो तो धोकादायक आहे. अशा प्रवृत्तीविरोधात कडक कारवाई व्हावी म्हणून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तसेच अग्नीशमन संचालकांनाही संदेश पाठवला होता मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने त्याची दखल घेतली.

संबंधित बातम्या