महाविद्यालय ऑनलाईन प्रवेशाची  गुणवत्ता यादी अजूनही अनिश्‍चित 

विलास महाडिक
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

अजूनही काही महाविद्यालयात अर्जांची छाननी प्रक्रिया संपलेली नाही त्यामुळे तारीख निश्‍चित झालेली नाही मात्र लवकरच पहिली गुणवत्ता यादी उपलब्ध होणार आहे. ज्यांना पहिल्या यादीमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना दुसऱ्या फेरीच्या यादीत मिळू शकते.

पणजी

गोव्यात महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यात पहिल्यांदाच समान ऑनलाईन प्रवेश पद्धत अवलंबिण्यात आली आहे. सुमारे १३ हजारांहून अधिकजणांनी अर्ज केले आहेत. ज्या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरला आहे त्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनमार्फत अर्जांची छाननी सुरू आहे. त्यामुळे प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची तारीख अजूनही निश्‍चित झाली नसल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयातील अधिकारी महादेव गावस यांनी दिली. 
या प्रवेशासाठी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत सरकारी तसेच अनुदानित महाविद्यालयांसाठी एकच समान पोर्टल सुरू करण्यात आले होते व त्यावरूनच मध्यवर्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी तसेच पालकांना महाविद्यालयात गर्दी करू नये हा त्यामागील हेतू होता. अजूनही काही महाविद्यालयात अर्जांची छाननी प्रक्रिया संपलेली नाही त्यामुळे तारीख निश्‍चित झालेली नाही मात्र लवकरच पहिली गुणवत्ता यादी उपलब्ध होणार आहे. ज्यांना पहिल्या यादीमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना दुसऱ्या फेरीच्या यादीत मिळू शकते. या अभ्यासक्रमामध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए, गृहविज्ञान, कृषी, बीए बीएड, बीएस्सी बीएड व इतरांचा समावेश होता. 
ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गेल्या १५ जुलैपासून सुरू झाली होती व २२ जुलै शेवटची तारीख अगोदर ठरविली होती मात्र त्यानंतर आणखी वाढ करून ती २६ जुलैपर्यंत करण्यात आली होती. प्रत्येक अर्जदाराला प्रवेशासाठी दोन महाविद्यालयांची नावे निवडण्यास मुभा होती. व्यावसायिक महाविद्यालयामधील पदवी अभ्यासक्रमासाठी ज्या अर्जदारांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळणार आहे त्या ऑनलाईन प्रवेश चाचणी ठेवण्यात येणार आहे. 

 

 

संबंधित बातम्या