शाळा, कॉलेज सुरू करा, पण..!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोविड महामारीच्या काळात बंद झालेली विद्यालये दिवाळीनंतर विद्यार्थ्यांसाठी उघडणार आहेत. दहावी आणि बारावीचे वर्ग २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

पणजी : कोविड महामारीच्या काळात बंद झालेली विद्यालये दिवाळीनंतर विद्यार्थ्यांसाठी उघडणार आहेत. दहावी आणि बारावीचे वर्ग २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना विद्यालयांत पाठवण्याची सक्ती सरकार पालकांना करणार नाही, तर हे वर्ग ऐच्छीक स्वरुपाचे असतील. घराकडून ऑनलाईन पद्धतीने शिकण्याची मुभा दिली जाणार आहे. तसेच शाळा सुरू करणार असे सरकार म्‍हणत असले, तरी कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर उपलब्‍ध साधनसुविधा, वाहतूक व्‍यवस्‍था याबाबत प्रश्‍‍नचिन्ह उपस्‍थित होत आहेत. त्‍याबाबत पालक अद्यापही संभ्रमात आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांशी या विषयावर चर्चा केली होती. यात पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना, प्राचार्य मंच, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, अल्पसंख्याक विद्यालयांचे प्रतिनिधी, विनाअनुदानित विद्यालयांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. त्यानंतर शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालकांच्या पातळीवर सर्व घटकांशी चर्चा करण्यात येत होती. त्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याआधारे मुख्यमंत्री बुधवारी (ता.४) सरकारचा निर्णय जाहीर करणार आहेत.

खात्रीलायकरीत्या मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच न बोलावण्याचे ठरवले आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मुल्यमापन ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या आधारे केले जाणार आहे. निरंतर सर्वंकष मुल्यमापन पद्धतीत पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गात एकाच विद्यार्थ्याला दोन वर्षे ठेवण्याची म्हणजे अनुत्तीर्ण करण्याची तरतूद नाही. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बसण्याची संधी या शैक्षणिक वर्षानंतर दिली जाणार आहे. यंदाच्‍या शैक्षणिक वर्षात दहावीत २४ हजार, नववीत २४ हजार, अकरावीत २० हजार, बारावीत २१ हजार एवढे विद्यार्थी आहेत.

पुढील वर्षी नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. याची तयारी करण्यासाठी सरकारने दोन समित्या नेमल्या आहेत. फेब्रुवारीपर्यंत त्यांना अहवाल सादरीकरणासाठी वेळही दिला आहे. जून २०२१ मध्ये ‘कोविड १९’ची परीस्थिती सुधारली आणि शाळेतील वर्ग नियमितपणे प्रत्यक्षरुपात सुरू झाले तर नव्या शैक्षणिक धोरणाला नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यंदा ऑनलाईन पद्धतीने सारे झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन किती काटेकोरपणे होणार याविषयी शंका आहे. त्याच परिस्थितीत या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यादान करण्याचे आव्हान शिक्षकवर्गाला पेलावे लागणार आहे.

बारावीच्या प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना गटागटाने विद्यालयांत बोलावले जाणार आहे. एकावेळी किती विद्यार्थ्यांना बोलावता येईल, प्रयोगशाळेचा आकार आणि इतर सुविधांची उपलब्धता यावर ठरवले जाणार आहे. कोविड महामारीच्या काळात दहावीची परीक्षा आणि बारावीची उर्वरीत परीक्षा घेतली गेल्याने पुढील वर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीची परीक्षा मंडळ घेणार नाही.

निर्णय पालकांनीच घ्‍यावा; सरकारची सावध भूमिका

सरकार सुरवातीच्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नववी आणि अकरावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठीही वर्गात हजेरी लावण्याची सक्ती केली जाणार आहे. आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे की, घराकडूनच शिकवायचे याचा निर्णय सर्वस्वी पालकांनीच घ्यावा, अशी सावध भूमिका सरकार घेणार आहे.

संबंधित बातम्या