कैद्यांचे कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील आंदोलन तूर्त मागे

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

मागण्यांवर विचार करण्याचे अधिकाऱ्यांकडून आश्‍वासन

पणजी: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये आवश्‍यक प्रमाणात सामानाचा पुरवठा करून चांगला आहार देण्याचे तसेच अंतरिम जामिनावर सुटका करण्याच्या मागणीवर विचार करण्याचे आश्‍वासन कारागृह अतिरिक्त महानिरीक्षकांनी दिल्याने कच्चे कैद्यांनी गेल्या तीन दिवसांपासून दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहारावर बहिष्कार टाकून सुरू केलेले आंदोलन आज तूर्त मागे घेतले आहे. 

कारागृहात आंदोलन सुरू केलेल्या कच्चे कैद्यांनी आज त्यांच्या मागण्यासंदर्भातचे निवेदन सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांना दिले. हे निवेदन अतिरिक्त महानिरीक्षकांकडे पाठवून त्यांच्याकडून आश्‍वासन मिळेपर्यंत किंवा त्यांनी प्रत्यक्षात कारागृहात येऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेईपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचे ठरविले होते. आज संध्याकाळपर्यंत या अधिकाऱ्यांनी कारागृहात चांगला आहार देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सामानाचा पुरवठा करण्याचे तसेच त्यांच्या इतर मागण्यांवर विचार केला जाईल असे आश्‍वासन देत असल्याचा निरोप पेडणेकर यांच्यामार्फत पाठविला. आंदोलनात सामील होऊन आहारावर बहिष्कार टाकलेल्यांमध्ये काही कच्चे कैदी हे वृद्ध असल्याने व त्यांच्या आरोग्याला धोका उद्‍भवू शकतो. काल एक कैदी बेशुद्ध होऊन पडला होता. त्यामुळे तूर्त हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय या कैद्यांनी घेतला अशी माहिती सूत्राने दिली. 

कारागृहात कोरोना संसर्ग कैदी असल्याने त्यांच्यासाठी आवश्‍यक ते उपचार तसेच कारागृहाच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात पावले उचलण्याची ग्वाही तुरुंग साहाय्यक अधीक्षकांनी दिल्याने कैद्यांचा उद्रेक होण्याआधी त्यांना नियंत्रणात ठेवण्यात यश आले. आता ही आश्‍वासने पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून कारागृहाची पाहणी तसेच कैद्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नसल्याने नाराजी आहे. हे कारागृह नव्हे तर सुधारणा गृह असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या कारागृहाच्या उद्‍घाटनप्रसंगी केले होते मात्र त्याची कार्यवाही होत नसल्याबद्दल कैद्यांमध्ये संताप आहे अशी माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या