कोलवाळ उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

टाळेबंदीमुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम दीर्घ काळ होते बंद

श्रीराम च्यारी

कोलवाळ

कोलवाळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, सध्या हे काम जोरात आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदार प्रयत्नशील आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील कोलवाळ येथील उड्डणपुलाला अडथळा ठरणारी आंब्याची मोठमोठी जुनाट झाडे कापण्यास काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच अन्य कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ते आम्रवृक्ष कापून उड्डाणपुलाच्या कामाला गती दिली होती; तथापि, त्यानंतर काही दिवसांनी देशभरात टाळेबंदी जाहीर केल्यामुळे महामार्गाचे काम दीर्घ काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर काही दिवसांपूर्वी या उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे. कोलवाळ ते करासवाडापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर सहा उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. सर्व उड्डाणपुलांचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे. 
कोलवाळ येथील उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तयार केलेले सिमेंट कॉंक्रीटचे स्लॅब उड्डाणपुलाच्या खांबांवर बसवण्यात आले आहेत. स्लॅब जोडल्यानंतर कॉंक्रीटचा रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लोखंड बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना माती घालून उड्डाणपुलाच्या उंचीएवढी भिंत तयार करण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याचे काम अर्धेअधिक पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गाची रुंदी २४.५ मीटर ठेवण्यात आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड तयार करण्यात येत आहेत. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना५.५ मीटरचे सर्व्हिस रोड बांधण्याचे हे काम अर्धेअधिक पूर्ण करण्यात आले आहे. सर्व्हिस रोडच्या बाजूला मोठे नाले बांधून पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोलवाळ येथील नदीवरील पुलाला समांतर बांधण्यात येणाऱ्या कॉंक्रीट पुलाचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे एकाच पुलावर वाहनांच्या वाहतुकीचा ताण पडत आहे. कोलवाळ पुलाला समांतर बांधण्यात येणारा कॉंक्रीट पूल लवकरात लवकर पूर्ण केल्यास जनतेच्या दृष्टीने ते सोयीचे होणार आहे. तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला त्यामुळे हातभार लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग ज्या तालुक्‍यांतून जात आहे, त्या तालुक्‍यांतील गावांना महामार्गाचा विशेष फायदा होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या परिसरात भविष्यात व्यवसायांचे जाळे विस्तारणार असल्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्यास बरीच मदत होणार आहे. वर्ष २०२१ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या