कोलवाळ क्रीडा प्रकल्प उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

colvale
colvale

कोलवाळ

कोलवाळ क्रीडा प्रकल्पाचे बरेचसे सामान चोरीस गेल्यामुळे गेली सुमारे सात वर्षे हा प्रकल्प उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या स्पोर्टस कॉम्पलेक्‍सची दुरुस्ती केल्याशिवाय उद्‌घाटन करणे अशक्‍य असल्याचे थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी या वार्ताहराशी बोलताना सांगितले.
सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना तो प्रकल्प उभारण्यात आला होता. त्या वेळी आमदार निळकंठ हळर्णकर पर्यटनमंत्री पदावर होते. कोलवाळ गावातील खेळाडूंसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंच्या अंगातील क्रीडागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना आंतरराज्य स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी सर्व सोयीनी उपयुक्त असे फुटबॉल मैदान कोलवाळ क्रीडा प्रकल्पाच्या अंतर्गत तयार करण्यात आले होते. तसेच, या प्रकल्पात अन्य क्रीडास्पर्धा घेण्यासाठी खेळाडूंना सुलभ व्हावे यासाठी रहाण्याची सोय व जेवणाची सोय करण्यासाठी कॅन्टीन व्यवस्था करण्यात आली होती.
दर्जेदार खेळाचे प्रदर्शन व्हावे, ग्रामीण भागातील लोकांसाठी क्रीडास्पर्धांचा लाभ घ्याता यावा, आंतरराज्य स्तरावरील खेळाडूंच्या स्पर्धा या मैदानावर व्हाव्या, खेळाडूंच्या अंगातील क्रीडागुणांचे प्रदर्शन युवा पिढीसमोर व्हावे इत्यादी हेतू डोळ्यांसमोर ठेवून या क्रीडा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. परंतु, अद्याप या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले नसल्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना या क्रीडा संकुलाचा काहीच उपयोग होऊ शकलेला नाही.
ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे भरमसाठ पैसा खर्च करून स्वत:च्या मुलांच्या अंगातील क्रीडागुणांना विकसित करणे शक्‍य होत नाही. ही समस्या हेरून कोलवाळ गावात चांगल्या प्रतीचे स्पोर्टर्स कॉम्पलेक्‍स बांधून अनेक वर्षे झाली. परंतु, हा प्रकल्प अद्याप खेळाडूंना मैदान उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे खूपच नुकसान होत आहे. क्रीडा खात्यातर्फे युवा पिढीसाठी घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धा एखाद्या गावातील शेतजमिनीवर घेणे भाग पडत आहे. त्यामुळे खेळाडूंना ते त्रासदायक ठरत आहे.
दरम्यान, ‘कोविड-१९’मुळे शासकीय पातळीवरील सर्वच विकासकामे रेंगाळली असल्याने टाळेबंदी संपल्यानंतरच या क्रीडा प्रकल्पाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com