तीस टक्के कमिशन न मिळाल्याने क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी क्रीडापटूंची बक्षीस रक्कम थकवली

UNI
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

राज्यातील क्रीडापटूंना बक्षिसादाखल दिली जाणारी रक्कम २०१७ पासून दिलेली नाही. २ कोटी १८ लाख रुपयांची ही रक्कम क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांना तीस टक्के कमिशन न मिळाल्यानेच वितरीत झाली नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पणजी - राज्यातील क्रीडापटूंना बक्षिसादाखल दिली जाणारी रक्कम २०१७ पासून दिलेली नाही. २ कोटी १८ लाख रुपयांची ही रक्कम क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांना तीस टक्के कमिशन न मिळाल्यानेच वितरीत झाली नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

आजगावकर यांनी याआधी कार्निव्‍हल व शिमगोत्सवाच्या बक्षिसांच्या रकमाही अडवून ठेवल्या होत्या, हे कोणी विसरलेले नाही असा टोलाही त्यांनी लगावला. सरकार संवेदनाहीन झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे इतर मंत्र्यांच्या खात्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. एका वर्षातील बक्षिसांची रक्कम मागेपुढे झाली हे ‘कोविड’ महामारीच्या काळात समजता येते. मात्र, सरकारने २०१७ पासूनची बक्षिसांची रक्कम क्रीडापटूंना अदा केलेलीच नाही. याशिवाय क्रीडा संघटनांनाही देय असलेल्या रकमेची हीच कथा आहे. क्रीडापटूंचे पैसे त्यांनी दादागिरीने अडवून ठेवले आहेत. त्या पैशांवर कमिशन मिळत नाही, हेच केवळ त्यांचे दुखणे आहे. या रकमेवरील ३० टक्के दराने कमिशन ६५ लाख ४० हजार रुपये होते.

मुख्यमंत्री राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगतात. कोविड काळात सरकारने केलेले व्यवस्थापन पाहता ते पटते. मग ही बक्षिसांची रक्कम अदा का केली जात नाही, याचे उत्तर क्रीडामंत्र्यांनी द्यावे. त्याशिवाय दिव्यांग खेळाडू, राष्ट्रीय पातळीवर नाव गाजवून आता निवृत्त झालेल्या खेळाडूंना द्यावयाची आर्थिक मदतही देण्यात आलेली नाही. क्रीडामंत्र्यांची कार्यक्षमता संपली आहे, कर्तव्यदक्षता हरवली आहे. त्यांनी या अक्षम्य अशा प्रमादाबद्दल राजीनामाच दिलेला बरा, असे पणजीकर म्हणाले.

अशी आहे देय रक्कम!
क्रीडा संघटनांना सरकार ५५ लाख ५९ हजार रुपये देणे आहे. राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवेल्या १८८ खेळाडूंना १६ लाख १४ हजार रुपये देणे आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या माजी ९१ क्रीडापटूंना २०१७-१८ मधील ३० लाख २० हजार रुपये, २०१८-१९ मधील ३५ क्रीडापटूंना २३ लाख ६४ हजार रुपये, २०१८-१९ मध्ये २३ जणांना १४ लाख ६४ हजार रुपये, २०१९-२० मधील ३८ लाख ८८ हजार रुपये, तर २०२०-२१ मध्ये ६० जणांना ३९ लाख ४८ हजार रुपये एवढी रक्कम सरकार देणे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. माहिती हक्क कायद्याखाली ही माहिती संकलीत केल्याचे त्यांनी सांगितले.  

क्रीडापटूंची बक्षीस रक्कम देणार - क्रीडामंत्री
क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले की, क्रीडापटूंच्‍या बक्षिसांच्या रकमेवर मंत्री कमिशन घेतात, असा आरोप करून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेसची संस्कृती दाखवली आहे. खेळाडूंच्या बक्षिसांची रक्कम दिली जाणे बाकी असेल, तर ती दिली जाईल. कोविड महामारीतून राज्य सरकार आता कुठे सावरत आहे. पणजीकर यांनी खालच्या पातळीवर घसरून आपलीही लायकी दाखवून दिली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पूर्वी काय केले होते, याची माहिती पणजीकर यांना आहे का? सवंग प्रसिद्धीसाठी हे असले धंदे करत असतात. क्रीडापटूंच्या रकमेवर कमिशन खाणे, हा गंभीर आरोप केल्यानेच मी दखल घेतली आहे. पुराव्यासह पणजीकर यांनी आरोप करावेत, असेही ते म्‍हणाले.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या