सासष्टीत तीन गटांकडून सामुदायिक शेती

Goarice
Goarice

- उत्तम गावकर

पडिक शेतजमीन लागवडीखाली आणण्यासाठी कृषी खात्याने सुरू केलेल्या सामुदायिक शेती योजनेत सासष्टीतील शेतकऱ्यांच्या तीन गटांची कामगिरी पथदर्शक ठरत आहे. या तीन गटांनी सासष्टीतील सुमारे १७ हेक्टर शेतजमिनीत या योजनेखाली भाताची लागवड केली असून या उपक्रमात एकूण ८१ शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेखाली या तिन्ही गटांना कृषी खात्यातर्फे ५७.२७ लाख खर्चून सिंचन, कुंपण व इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

पडिक जमिनी लागवडीसाठी ९० टक्के अनुदान.

पाच वर्षांपासून अधिक काळ पडिक राहिलेल्या जमिनीत सामुदायिक शेती केल्यास शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळत असून फातोर्डा, माजोर्डा आणि दवर्लीतील शेतजमिनी गेल्या अनेक वर्षापासून पडिक राहिल्यामुळे या शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे. सामुदायिक शेतीचा लाभ घेण्यासाठी दवर्लीतील रोझरी कृषी सहकारी संस्था, माजोर्डा पाटे शेतकरी संस्था आणि फातोर्डा शेतकरी संस्था पुढे आल्या असून एकूण ८१ शेतकरी यात सहभागी झाले आहेत, अशी माहिती सासष्टी व मुरगावचे विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी दिली.

शेतकऱ्यांना सुविधांचा लाभ.

फातोर्ड्यातील ३.१८७ हेक्टर जमिनीत ४० शेतकरी, माजोर्ड्यातील १०.६८ हेक्टर जमिनीत १८ शेतकरी आणि दवर्लीत ३.६ हेक्टर जमिनीत २३ शेतकरी सामुदायिक शेती उपक्रमात सहभागी झाले आहेत. या तिन्हीही शेतकरी संस्थांना अधिकृतरित्या मान्यता मिळाली असून या संस्थांना सुमारे ५७.२७ लाख रुपयांच्या सुविधांचा लाभ होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सामुदायिक शेतीसाठी किमान १० शेतकरी आणि १ हेक्टर शेती असणे आवश्यक आहे. सामुदायिक प्रकल्पांतर्गत सर्व योजना एकत्रितरित्या राबविण्यात येणार असून यात सिंचन, कुंपण, तसेच इतर साधनुसविधांचा लाभ शेतकऱ्यांना या योजनेचा माध्यमातून मिळतील. योजनेंतर्गत फातोर्डा, माजोर्डा आणि दवर्लीतील शेतकऱ्यांनी कुंपण आणि सिंचन सुविधेचा लाभ घेतला असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतात हव्या असलेल्या सर्व साधनसुविधा उभारून देण्यात येईल.
-शेरीफ फुर्तादो, सासष्टी व मुरगावचे विभागीय कृषी अधिकारी

शेती उपक्रमात तारवटींचाही सहभाग.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे मायदेशी परतलेले चिंचिणी येथी तारवटी सामुदायिक शेती करण्यासाठी पुढे आलेले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी या तरुण युवकांसोबत बैठक घेऊन योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. चिंचिणी भागात शेती करण्यासाठी शेतजमिनही निश्चित केलेली असून ही जमीन गेल्या अनेक वर्षांपासून पडिक राहिली होती, अशी माहिती सासष्टी व मुरगावचे विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी दिली.

शेतकऱ्यांना एकत्रित करून उपक्रम.

शेतजमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांमुळे शेतीची सुधारणा आणि गुंतवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित करून शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सामुदायिक शेती प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार, असेही त्यांनी सांगितले.
सासष्टी तालुक्यातील सामुदायिक शेती करण्यात येणाऱ्या शेतजमिनीत खरीप हंगामात भात शेतीची लागवड केली असून रब्‍बी हंगामात भाज्यांची लागवड करण्यात येणार आहे.

पाच वर्षे शेती करणे आवश्‍‍यक.

सामुदायिक शेतीत ९० टक्के अनुदान मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाच वर्षे एकत्रित राहून शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना यांत्रिक पेरणी करण्याची सुविधाही या प्रकल्पा मार्फत पुरविण्यात येत आहे, असे फुर्तादो यांनी सांगितले. शेतजमिनी पडिक राहू नये तसेच शेतकऱ्यांना एकत्रित आणावे, या उद्देशाने सुरू केलेल्या सामुदायिक शेतीचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होत असून शेतकरी वर्गानी एकत्रित येऊन शेती केल्यास मिळालेल्या पिकाचे मार्केटिंग करून त्याची विक्री केल्यास शेतकऱ्यांना जास्त सोयीस्कर होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com