पणजी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग आता अनेक भागात पसरत असल्याने त्याला स्थानिक संसर्ग म्हणता येणार नाही, तर सामूहिक संसर्ग आहे असे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर मान्य केले. आज दिवसभरात ४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत इस्पितळात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६६७ आहे. आज एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजारावर (१०३९) पोहोचली आहे.
राज्यातील कोविड - १९ची सद्यस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आजपर्यंत राज्यात १०३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ३७० जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज २८६६ जणांची ‘कोविड - १९’ची चाचणी करण्यात आली. त्यातील १९२२ जणांची निगेटिव्ह, तर ४४ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ९०० जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे बाकी आहे. राज्यात मिळालेल्या कोनोराबाधित रुग्णांवर अलगीकरण वॉर्डमध्ये १५ जणांवर उपचार सुरू आहे. विविध रेसिडेन्सी व हॉटेल्समध्ये ७७८ जणांना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. सध्या राज्यात ६६७ कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यामध्ये अधिक तर सडा - ५९, बायणा - ३९, चिंबल - २५, मोर्ले - २१, नवे वाडे - २३ व कुडतरी - ३१ यांचा समावेश आहे. रस्ता, रेल्वे व विमानाने प्रवास करून आलेल्यांची संख्या ९२, मांगोरहिल - २५५, तर त्याच्याशी निगडित असलेले २०३, मडगाव १६, आंबेली २७, केपे ८, साखळी ५, लोटली ११, इंदिरानगर चिंबल ४, काणकोण ३, डिचोली व म्हापसा प्रत्येकी २ तसेच बेती, पर्वरी, वाडे व कुंडई येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे, तर कोविड इस्पितळात उपचार घेत असलेल्यांची प्रकृती सुधारत आहे. कोरोनाबाधित असूनही लक्षणे दिसत नाही अशांना कोविड उपचार केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्याच्या आजुबाजूच्या तसेच सभोवती राहत असलेल्या किमान १०० जणांची कोविड - १९ चाचणी करण्यात येऊन सावधगिरी बाळगण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
टाळेबंदी काळातील रेल्वे, जल तसेच विमान मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती कायम असून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्यांना विलगीकरण केले गेले आहे, त्यांच्यावर निगरानी ठेवण्यात आली आहे. अनेक भागामध्ये लोकांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. हा संसर्ग जरी तालुक्यात पोहोचला, तरी प्रत्येकाने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आरोग्य खात्याकडून जनजागृती व त्याची माहिती देणे सुरू आहे. लोकांनी सहकार्य दिल्यास या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात शक्य आहे. गोव्यात येणाऱ्यांची चाचणी करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज पत्रकार परिषदेवेळी पुन्हा आवर्जून उल्लेख केला.
दरम्यान, मुरगाव पालिकेचे चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पालिकेच्या एक कर्मचाऱ्याची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. गोमेकॉ इस्पितळात ड्युटीवर असलेला सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह सापडला आहे. खोर्ली - म्हापसा येथेही आज चार नव्या कोरोनाबाधित रुण्गांची नोंद झाली आहे.