वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी बंपर ऑफर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

२० हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतची सवलत ग्राहकाला चार चाकी वाहनामागे मिळत आहे. अशा प्रकारे दुचाकी वाहनांवरही घसघशीत अशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत सवलत देण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला आहे. 

पणजी: दिवाळी पाडवा दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणावी तशी विक्री वाहनांची झाली नसल्याने अनेक कंपन्यांनी दिवाळीच्या तोंडावर लोकांनी नवे वाहन खरेदी करावी, यासाठी बंपर ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. २० हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतची सवलत ग्राहकाला चार चाकी वाहनामागे मिळत आहे. अशा प्रकारे दुचाकी वाहनांवरही घसघशीत अशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत सवलत देण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला आहे. 

सर्वप्रकारच्या माध्यमांतून सध्या वाहन उद्योगातील कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या जाहिराती करण्यावर भर दिलेला दिसत आहे. वाहन विक्री व्यवसायाचा अंदाज घेतला तर नामांकित अशा मारुती सुझुकी, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा अशा कंपन्यांच्या दररोज माध्यमांतून दिवाळी सणासाठी सवलतींच्या जाहिराती नजरेस पडत आहेत. विशेषतः काही मोजक्याच कंपन्या दूरचित्रवाहिन्यांचा वाहनांच्या जाहिरातीसाठी वापर करीत असले तरी मुद्रित आणि समाजमाध्यमांतून विविध वाहनांवर अमुक-अमुक सवलत असल्याच्या जाहिरातींची सध्या रेलचेल सुरू झाली आहे.  

विशेषतः समाजमाध्यमांतून एखाद्या वाहनांविषयी जाणून घ्यावयाचे झाले आणि तर संबंधित कंपनीकडून तुमची नाव, पत्ता व संपर्कक्रमांकासह माहिती मागितली जाते, ती माहिती भरून पाठविल्यानंतर एक मिनिटांच्या आत संबंधित वाहनांच्या कंपन्या माहिती जाणून घेणाऱ्याशी संपर्क साधत आहेत. कोरोनामुळे टाळेबंदीत वाहन विक्री व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागला असून, तो तोटा भरून काढण्यासाठी सर्वच कंपन्या आता सरसावल्या आहेत. चारचाकी वाहने बनविणाऱ्या काही कंपन्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रासाठी घसघशीत अशी ५० हजारांपर्यंत सवलती दिल्या आहेत. या सवलती पाहून लोक वाहन खरेदीकडे वळतील, अशी आशा आहे. 

विशेष म्हणजे मर्सिडिज वाहने बनविणाऱ्या कंपन्याही मागे राहिलेल्या नाहीत, त्यांनीही लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी करण्यात सुरुवात केली आहे. टाळेबंदीच्या काळात देशात सर्वात जास्त वाहन विक्रीत आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने मोठ्या सवलती दिल्या असल्याची माहिती चौगुले शोरूममधील व्यवस्थापकांनी सांगितले. दुचाकी वाहन विक्रीलाही गती मिळावी, यासाठी काही कंपन्यांनीही सवलती जाहीर केलेल्या आहेत.

संबंधित बातम्या