सत्तरीत ७० टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

गेल्या वर्षी पावसाळी हंगामात सत्तरी तालुक्यात चक्रीवादळ व पुराचा मोठा फटका बागायतदारांना बसला होता. त्यानुसार सत्तरीतील ७० टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

वाळपई

गेल्या वर्षी पावसाळी हंगामात सत्तरी तालुक्यात चक्रीवादळ व पुराचा मोठा फटका बागायतदारांना बसला होता. तार, सोनाळ या गावात म्हादई नदीचे पाणी नदी किनारी भागातील कुळागरांत प्रचंड प्रमाणात घुसले होते. त्यात सुपारी, केळी, नारळ, मिरी या पिकांचे नुकसान झाले होते. अशाच प्रकारे अन्य गावातही बागायती, शेतीची नुकसानी झाली होती. त्यात सुमारे चारशे शेतकऱ्यांना फटका बसला होता. या नुकसान भरपाईसाठी कृषी खात्यात लोकांनी अर्ज केले होते. वाळपई कृषी कार्यालयात या अर्जांची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार सत्तरीतील ७० टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
वाळपई कृषी कार्यालयातून या नुकसानीच्या अर्जांची वेळीच दखल घेऊन कृषी खात्याच्या मुख्य कार्यालयात पाठपुरावा केला होता व यात १ कोटी ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. या सर्व नुकसानी खर्चाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर जवळपास ६५ ते ७० टक्के शेतकरी बंधूंना ही नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती वाळपई कृषी कार्यालयातून मिळाली आहे. उर्वरीत सुमारे तीस टक्के शेतकरी बांधवांच्या त्यांच्या बँक खात्यावर नुकसानीची रक्कम पोहचलेली नाही. त्याची प्रक्रियाही सुरू आहे. कृषी खात्यातर्फे केळीला ५०० रुपये प्रती झाड, दोनशे रुपये लहान केळीचे झाड, नारळाला चार हजार, काजूला चारशे रुपये, सुपारीला एक हजार रुपये प्रती नग अशी नुकसान भरपाई दिली जाते.

गतवर्षी १ कोटी ३ लाख नुकसानीची रक्कम मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी बऱ्याचजणांना पैसे मिळाले आहेत, तर काहीजणांना मिळणे बाकी आहे. आपण सत्तरी तालुक्यात सर्वांना कृषी विभागाची चांगली सेवा मिळेल यासाठी नेहमीच कटीबध्द असणार आहे. सत्तरीत कष्टकरी लोक आहेत, पण अनेकवेळा वादळी पाऊस व अन्य कारणांमुळे पिकाचे नुकसान होत असते.
- प्रकाश राऊत (कृषी अधिकारी, वाळपई)

संबंधित बातम्या