वेळ्ळीतील काँग्रेस उमेदवारांमध्ये विधानसभेसाठी चुरस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

काँग्रेसमधून १० आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत.  सासष्टीतील वेळ्ळी मतदारसंघातही राजकीय स्थितीत बदल झाला असून या बदललेल्या स्थितीचा लाभ उठवण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. 

मडगाव : काँग्रेसमधून १० आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत.  सासष्टीतील वेळ्ळी मतदारसंघातही राजकीय स्थितीत बदल झाला असून या बदललेल्या स्थितीचा लाभ उठवण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. 

काँग्रेसमधून भाजपात गेलेले विद्यमान जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज हे भाजपच्या उमेदवारीवर की पाठिंब्यावर अपक्ष म्हणून उभे राहतील याबद्दल वेळ्ळीवासीयांमध्ये कुतूहल आहे. दुसऱ्या बाजुला  वेळ्ळीचे काँग्रसेचे संभाव्य उमेदवार म्हणून दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांना प्रोजेक्ट करण्यात येत असले तरी काँग्रेसच्या उमेदवारीवर माजी आमदार बेंजामिन सिल्वा, वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांचाही डोळा आहे. आम आदमी पार्टीही तयारी करत आहे. 

 फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस यांना संभाव्य उमेदवार म्हणून  प्रोजेक्ट करण्यात येत आहे. डायस हे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष आहेत. काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. जिल्हा पंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केल्यानंतर त्यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. वेळ्ळी मतदारसंघात ते सध्या सक्रिय झालेले आहेत.  माजी आमदार बेंजामिन सिल्वा २००७ पासून वेळ्ळीच्या राजकीय रिंगणात आहेत. २००७ च्या निवडणुकीत त्यांनी फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांना कडवे आव्हान दिले होते. या निवडणुकीत ५ हजारपेक्षा जास्त मते मिळवून त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. पुढच्या २०१२ च्या निवडणुकीत त्यांनी रॉड्रिग्ज यांना पराभूत केले. तथापि, २०१७ मध्ये वेळ्ळीच्या राजकीय सारीपाटावरचे फासे उलटे पडले आणि पुन्हा रॉड्रिग्ज निवडून आले. तथापि, सिल्वा यांनी पुढच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनाही विधानसभा निवडणूक खुणावत असून त्यांनीही मोर्चेबंधाणी सुरू केली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत वेळ्ळी मतदारसंघात काँग्रेसने ज्युलियो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे. डिसिल्वा यांनी फर्नांडिस यांना पाठिंबा दिलेला आहे.

जिल्हा पंचायत निवडणूकीच्या प्रचार काळात डिसिल्वा यांनी २०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नरत आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळो अथवा ना मिळो, पण आपण निवडणूक रिंगणात असणारच असे त्यांनी जाहीर केले आहे. सध्या जोषात असलेल्या गोवा फॉरवर्डची वेळ्ळी मतदारसंघाच्या आघाडीवर मात्र सामसूम दिसते. मागच्या निवडणुकीत गोवा फॉरवर्डतर्फे माजी जिल्हा पंचायत सदस्य अॅंथनी (बाबूश) रॉड्रिग्ज यांनी वेळ्ळीत निवडणूक लढवली होती व त्यांनी १४६० मते मिळवली होती. याखेपेस ते जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर आंबेलीचे माजी सरपंच क्रुझ सिल्वा यांनी मागची निवडणूक आम आदमी पार्टीतर्फे (आप) लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ३४२३ मते मिळवून लक्ष वेधून घेतले होते.

वेळ्ळीत इतर राजकीय नेते सक्रिय असताना क्रुझ सिल्वा यांचे अस्तित्व अध्याप जाणवत नाही. तथापि, आपण प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहोत, असे क्रुझ सिल्वा यांनी जाहीर केले आहे. 

फिलीप नेरी रॉड्रिग्ज हे सध्या भाजपात असले तरी वेळ्ळी मतदारसंघात ते आगामी निवडणूक भाजपतर्फे लढवणार का याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. वेळ्ळी मतदारसंघात भाजपची चार - साडेचार हजार मते आहेत. वेळ्ळीत निवडणूक लढवण्याबाबत भाजपची रणनिती काय असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपतर्फे मागची निवडणूक विनय तारी यांनी लढवली होती. त्यांना १४६५ मते मिळाली होती. 

संबंधित बातम्या