बेकायदेशीर आडनाव बदलणाऱ्याविरोधात तक्रार

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

‘ॲग्रेसिव्ह गोवन्स’चे मुख्य निबंधकांना निवेदन सादर; चौकशी करण्याची मागणी

फोंडा: गोवा राज्यातील बहुजन समाजाच्या आडनावाचा वापर करून इतर मागासवर्गीयांसाठी असलेले फायदे उपटण्याचा प्रयत्न केला जात असून याप्रकरणी अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या ॲग्रेसिव्ह गोवन्स या संघटनेने भंडारी समाजाच्या आडनावाचा वापर करण्यासाठी जयप्रकाश इराप्पा सुतगट्टीकर याने चालवलेल्या प्रकाराला विरोध केला आहे. ॲग्रेसिव्ह गोवन्सचे पदाधिकारी संतोष तारी, ओंकार नाईक व ॲड. साईराज फडते यांनी यासंबंधीची तक्रार गेल्या सोमवारी राज्य सरकारच्या मुख्य निबंधकांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे मुख्य सचिव, कायदा सचिव व कायदा मंत्री नीलेश काब्राल यांना देण्यात आल्या आहेत. 

ॲग्रेसिव्ह गोवन्स या संघटनेने दिलेल्या तक्रारीनुसार जयप्रकाश इराप्पा सुतगट्टीकर नामक एका इसमाने आपले सुतगट्टीकर हे आडनाव बदलून नाईक लावण्यासाठी सरकार दरबारी कागदोपत्री सोपस्कार चालवले आहेत. निबंधकांकडे याप्रकरणी अर्ज करण्यात आला असून सरकारी राजपत्रातही यासंबंधी प्रसिद्धी देण्यात आली आहे. मात्र या प्रकाराला ॲग्रेसिव्ह गोवन्स या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र हरकत घेतली असून नाईक हे आडनाव गोव्यातील बहुजन समाज असलेल्या भंडारी समाजाचे असून सुतगट्टीकर हे आडनाव बदलून नाईक करण्यामागे इतर मागासवर्गीयांचे लाभ उठवण्याचा हा प्रकार आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या निबंधकानी त्वरित दखल घेऊन संबंधित इसमाविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवावा व आवश्‍यक चौकशी करून अशाप्रकारचे आडनाव बदलण्यास देऊ नये, अशी जोरदार मागणी केली आहे. 

मूळात आडनाव बदलण्यासाठी संबंधित इसमाने ज्यांच्याअंतर्गत यासंबंधीची कार्यवाही आहे, त्या निबंधकांकडे कायदेशीर सोपस्कार केलेले नाहीत. नाईक हे आडनाव भंडारी समाजाची ओळख असून इतर मागासवर्गीय असलेले नाईक हे खरे गोमंतकीय आहेत. मात्र इतर मागासवर्गीयांसाठी असलेले लाभ उठवण्यासाठी आडनाव बदलण्याचा हा प्रकार असून या प्रकाराला ॲग्रेसिव्ह गोवन्सचा तीव्र विरोध आहे. सरकारने याप्रकरणी त्वरित हस्तक्षेप करून संबंधिताची सखोल चौकशी करावी व सत्य काय ते समोर आणावे, असे संतोष तारी, ओंकार नाईक व साईराज फडते यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

संबंधित बातम्या