धुमरेर डोंगर माथ्यावरील अनधिकृत बांधकामाविरुद्ध तक्रार

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कवळे पंचायत मंडळ, ‘एग्रेसी गोवन’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

फोंडा,  कवळे पंचायत क्षेत्रातील धुमरेर डोंगर माथ्यावरील अनधिकृत बांधकाम उभारण्यात आल्याबाबतची तक्रार ॲग्रेसीव्ह गोवनचे उपाध्यक्ष ओंकार रामचंद्र नाईक यांनी १७ जानेवारी २०२० रोजी कवळे पंचायतीत केली होती. या तक्रारीची दखल घेऊन कवळे पंचायत मंडळ व एग्रेसी गोवनच्या पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाची पाहणी नुकतीच केली. 

कवळे पंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर व ॲग्रेसीव्ह गोवनचे अध्यक्ष संतोष तारी, उपाध्यक्ष ओंकार नाईक व कवळे पंचायत मंडळाचे सदस्य यांनी गुरुवारी (ता. ३) जाऊन अनधिकृत बांधकामाची पाहणी केली. कवळेचे पंचायत सचिव हरिश्‍चंद्र नाईक यांनी अनधिकृत बांधकामाचा पंचनामा केला. 

कवळे पंचायतीने एका गोव्यातील व्यक्तीला घर क्रमांक दिला होता. त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला घराची विक्री केली. दुसऱ्या व्यक्तीने बिगर गोमंतकीय व्यक्तीला घर विकले होते. तिसऱ्या घर खरेदी केलेल्या व्यक्तीकडून घराजवळ बेकायदेशीररित्या भाडेपट्टीसाठी एकाच नंबराखाली चौदा खोल्या बांधून अनधिकृत बांधकाम केल्याचे कवळे पंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर यांना प्रत्यक्ष पाहणीअंती आढळून आले आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींनी घराजवळ अधिकृत बांधकाम करून भाडेपट्टीसाठी खोल्या बांधल्या असून त्यासाठी कवळे पंचायतीकडून कायदेशीर परवाना, फोंडा नगरनियोजन खात्याच्या परवाना तसेच अधिकृत बांधकामासंबंधी फाईल कवळे पंचायतीकडे सादर केली नसून, पंचायत सचिवांनी तयार करणारा अधिकृत बांधकाम संबंधीचा अहवाल कवळे पंचायत मंडळाच्या पाक्षिक बैठकीत मांडण्यात येईल. यासंबंधी घराजवळ अनधिकृत बेकायदेशीर बांधकामाविषयी घरमालकाकडून कायदेशीर दस्तऐवज देण्याची सूचना करण्यात येणार असून आवश्‍यक कागदपत्रे मिळाली नसल्यास कोणतीही गय न करता बेकायदेशीर बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कवळे पंचायतने अजूनपर्यंत कुठल्याही बेकायदेशीर घरांना घरक्रमांक दिला नसून घर मालक घरक्रमांकाचा फायदा उठवत घराजवळ अनधिकृत बांधकामे करून गैरफायदा उठवत असल्याचे सरपंच राजेश कवळेकर म्हणाले.

संबंधित बातम्या