खनिज मालाच्या चोरीप्रकरणी गोवा सीबीआयकडे तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

वास्को येथील मुरगाव बंदरातून खनिज मालाच्या कथित चोरीप्रकरणी सरकारकडून कोणतीच दखल घेत नसल्याने काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह बांबोळी येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा शाखेकडे तक्रार दाखल केली.

पणजी: वास्को येथील मुरगाव बंदरातून खनिज मालाच्या कथित चोरीप्रकरणी सरकारकडून कोणतीच दखल घेत नसल्याने काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह बांबोळी येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा शाखेकडे तक्रार दाखल केली. या घोटाळ्यात खाणमंत्री असलेले मुख्यमंत्री गुंतले असल्याची शक्यता असल्याने तक्रार दाखल करण्याचा निर्देश सरकारकडून दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. एम एन कन्स्ट्रक्शन्स स्टेवेडोरिंगचे मिलिंद नाईक, कोडी रिसोर्सिसचे श्रीनाथ पैक, खाण संचालक तसेच मुरगाव बंदरच्या अध्यक्षांचा या तक्रारीत समावेश करण्यात आला आहे. सीबीआयने याप्रकरणी त्वरित चौकशी करून या कथित चोरीप्रकरणास जबाबदार असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आमोणकर यांनी केली. यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी तक्रारीची प्राथमिक चौकशी केली जाईल व तक्रारीसोबत दिलेल्या पुराव्यांची शहानिशा करून आवश्‍यकता लागल्यास तक्रारदाराला अधिक माहिती देण्यासाठी बोलावू असे आश्‍वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस युथ अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारांसमोर बोलताना गोवा काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले की, मुरगाव बंदरातील खनिज चोरीप्रकरणी २२ खात्यांकडे आतापर्यंत या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. लोकायुक्तकडेही तक्रार दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी पुराव्यानिशी सादर केल्या आहेत. या कथित चोरीप्रकरणी आवाज उठविल्यानंतर मुरगाव बंदर व्यवस्थापनाने या प्रकरणात गुंतलेल्या सोडून बंदरच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करून बळीचा बकरा करण्यात आला आहे. यातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्यासाठी ही कारवाई दिशाभूल करणारी आहे.

मुरगाव बंदरमध्ये बेकायदा खनिज उचलणे तसेच त्यासाठी परवानगी नसताना मशिनरी मुरगाव बंदरमध्ये नेण्यामध्ये मुरगाव बंदर, खाण खाते तसेच स्थानिक आमदार तसेच सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. ज्या अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे त्यांना उच्च स्तरावरून निर्देश असल्याशिवाय त्यांनी बघ्याची भूमिका घेणे शक्य नाही, असे ते म्हणाले. 
मुरगाव बंदरात बेकायदेशीरपणे खनिज मालाची वाहतूक बार्जमधून करून ती जहाजामध्ये नेण्यात येत आहे. हे जहाज खनिज मालाने भरल्यावर ते जाण्याची वाट सरकार पाहत आहे. त्यामुळे तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार सादर करूनही मुरगाव बंदरात जाऊन पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही.

संबंधित बातम्या