पणजीत नो पार्किंगचे फलक कुणाच्या परवानगीने उभारण्यात आले?

दैनिक गोमंतक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

राजधानीत ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी नव्याने लावण्यात आलेल्या फलकांबाबत महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्याविषयी स्थायी समितीची किंवा महापालिकेच्या मासिक सभेतही चर्चा झालेली नाही.

पणजी: राजधानीत ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी नव्याने लावण्यात आलेल्या फलकांबाबत महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्याविषयी स्थायी समितीची किंवा महापालिकेच्या मासिक सभेतही चर्चा झालेली नाही. तरीही अनेक ठिकाणी नव्याने फलक उभारण्यात आले असून त्याविषयी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

राजधानीत सध्या वाहन पार्किंगवरून महापालिकेने वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्यातून महापालिकेला आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेला काही रक्कम मिळत आहे. परंतु महापालिका कार्यक्षेत्रात नव्याने नो पार्किंगचे फलक लावण्यात आले असून, त्या फलकावर जाहिरातीसाठी आणखी एक फलक दिला असून, त्यावर संपर्क क्रमांक लिहिण्यात आला आहे, असे फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्‍यक असल्याचे नगरसेवक हळर्णकर यांचे म्हणणे आहे.

महापालिका इतर फलकांवर कारवाई किंवा आकार आकारते, त्यातून महापालिकेच्या तिजोरीत रक्कम येते. परंतु असे नो पार्किंगचे फलक परवानगी न घेता उभारण्यात आले असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले. कसिनोमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची वाहने सध्या काही प्रभागांत कोठेही उभी केली जात होती, त्यावर महापालिकेने कारवाई सुरू केल्याने वाहतुकीला शिस्त लागली असल्याबद्दल हळर्णकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या