कोरोनासंदर्भात ‘व्हटस्अप’वरून अफवा  पसरविल्याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांची तक्रार 

dainik gomantak
बुधवार, 3 जून 2020

बोगस व चुकाची माहिती पसरवून लोकांत भीती व तणाव निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. या व्हटस्अपवरील माहितीशी काहीही संबंध नसताना अशा चुकीची माहिती देऊन अफवा पसरवण्याचा हा प्रयत्न आहे

पणजी

कोविड - १९ चा राज्यात सामुदायिक प्रसार सुरू झाला असल्याची चुकीची माहिती व्हटस्अप सोशल मिडियावरून पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी त्यांनी महामारी कायद्याखाली जिल्हाधिकारी व पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
एका सोशल मिडियावरील व्हटस्अप ग्रुप आरोग्यमंत्र्यांच्या छायाचित्राने कोरोना बाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले तसेच गोव्यात कितीजणांमध्ये सामुदायिक प्रसार झाला आहे, याचा उल्लेख करण्यात आला आहे. असा बोगस व चुकाची माहिती पसरवून लोकांत भीती व तणाव निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. या व्हटस्अपवरील माहितीशी काहीही संबंध नसताना अशा चुकीची माहिती देऊन अफवा पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या कोविड - १९ मुळे राज्य सरकार कोरोना बाधितांचा अधिक प्रसार होऊ नये तसेच सामुदायिक प्रसारापासून गोव्याला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना काहीजण या संवेदनशील विषयाची गंभीर दखल घेत नाही हे सहन केले जाणार नाही. अशा व्यक्तींविरुद्ध सरकार कडक पावले उचलून कारवाई करणार असल्याचे मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्त केले. 
ज्यांनी सोशल मिडियावरून कोरोना विषाणू साथीसंदर्भाची माहिती देऊन अफवा पसरवत त्यांच्याविरुद्ध या महामारी कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी होऊन संबंधिताला योग्य कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा प्रकरणांची गंभीर दखल यापुढे घेतली जाणार आहे. या महामारीविरोधात देशात तसेच राज्य सरकार लढा देत असताना यासंदर्भात कोणीही अफवा पसरवू नये. लोकांनी आरोग्यमंत्र्यांवर विश्‍वास ठेवावा, अशी विनंती करण्यात येत आहे. या महामारीविरोधात सरकारी यंत्रणा सुविधा व उपचार रुग्णांना देऊन त्यांना बरे करण्याचे प्रयत्न करत आहेत. या महामारीविरोधात सर्वांनीच लढा देण्यासाठी आवश्‍यक ती काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्वांनीच लढा देण्यासाठी व कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहूया, असे आवाहन राणे यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या