गोव्यात तात्पुरत्या सोयींमुळे सचिवांविरुद्ध तक्रारी

administrative building of goa state assembly
administrative building of goa state assembly

पणजी- राज्यात एकूण १९१ पंचायती असून, या संख्येपेक्षा पंचायत संचालनालयाकडे ३५ अतिरिक्त सचिवांची संख्या आहे. परंतु अनेकजणांच्या रजा, महिला सचिवांच्या प्रसुतीकाळाताल रजा अशा प्रकारामुळे पंचायत संचालनालयाला तात्पुरती सोय करावी लागते. परंतु, ती सोय पंचायतींना मान्य होत नसल्याने सचिवांबद्दल संचालनालयाकडे तक्रारी वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. 

पंचायत संचालनालयाच्या अंतर्गत सचिव काम करतात. त्यामुळे राज्यातील एकूण सचिव पदांची संख्या ही २२६ आहे. त्यामुळे राज्यात १९१ पंचायती असून, त्यापेक्षा ३५ सचिव अतिरिक्त असूनही, अनेक सचिवांकडे दोन-दोन पंचायतींचा भार कसा काय टाकला जातो, असा प्रश्‍न पडणे साहजिक आहे. परंतु सध्याच्या स्थितीत राज्यात १९६ सचिव कार्यरत आहेत. त्यातील बरेच सचिव विविध प्रकारच्या रजेवर गेले असल्याने अनेकांकडे दोन पंचायतींचा कार्यभार सोपविला जातो. 

दोन पंचायतींचा कारभार सोपविल्याने काही पंचायतींचे सदस्यांचे त्या सचिवाकडे सूर जुळतात, तर काही सदस्यांचे सूर जुळत नाहीत. याविषयी ताजे उदाहरण द्यायचेच झाले तर हळदोणे पंचायतीचे देता येतील. कारण या पंचायतीत सत्ताधारी सात सदस्यांनी सचिवाच्या कामाविरुद्ध पंचायत संचालनालयाकडे दोनवेळा तक्रारी केल्या होत्या. काल या सदस्यांनी पंचायत संचालकांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. तर उर्वरित चार सदस्यांना त्या सचिवाचे काम उत्तम वाटत होते. अशा राजकारणात अनेक सचिवांना काम करावे लागत असते. अनेक पंचायतींचे सदस्य सचिवांविषयी संचालनालयाकडे तक्रारी करतात, त्याला कारण म्हणजे दोन-दोन पंचायतींचा भार सांभाळणे होय. 

कोरोनामुळे पदे भरण्‍याची प्रक्रिया रखडली

पंचायत संचालनालयाने अशा येणाऱ्या तक्रारी निकाली काढण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ३५ पैकी २६ सचिव भरण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार संचालनायाने जाहिरातही प्रसिद्ध केली होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. ही पदे भरली तर काहीप्रमाणात संचालनालयाकडे येणाऱ्या तक्रारी कमी होतील आणि पंचायतींना कायमस्वरुपी सचिव मिळतील, हे स्पष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com