म्हावळिंगेवासीयांचा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत मतदारसंघातील वन-कुडचिरे पंचायत क्षेत्रातील म्हावळिंगे गावातील नागरिकांनी एकसंध राहताना आज झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला

डिचोली: कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघातील वन-कुडचिरे पंचायत क्षेत्रातील म्हावळिंगे गावातील नागरिकांनी एकसंध राहताना आज झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला. रस्ते आदी गावातील प्रमुख मागण्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे एकवटलेल्या आणि आक्रमक बनलेल्या म्हावळिंगे गावातील मतदारांनी ठाम राहताना आज झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानात अखेरपर्यंत भाग घेतलाच नाही. केवळ दोन बीएलओंनी मात्र मतदान केले. 

कोरोनामुळे गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाचा टक्का घटला ; मतमोजणी उद्या -

नाईकवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत स्थापन करण्यात आलेल्या दोन मतदान केंद्रापैकी एका केंद्रावर ६१५ आणि दुसऱ्या केंद्रात ५४७ मिळून १ हजार १६२ मतदारांना मतदानाचा हक्‍क होता. पैकी या मतदान केंद्रावर नियुक्‍त केलेल्या स्थानिक बीएलओ मिळून दोघांना मतदान करणे भाग पडले. अन्यथा गावातील १ हजार १६० मतदार मतदानासाठी घराबाहेर पडलेच नाहीत. हरिजनवाडा, मयेकरवाडा, सातेरकरवाडा, पलतडवाडा आणि घाडीवाडा या गावातील पाचही वाड्यावरील मतदार मतदान न करण्याच्या आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. आतापर्यंत एकाच गावातील एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची ही घटना राज्याच्या निवडणूक इतिहासातील बहुधा पहिलीच वेळ असावी. म्हावळिंगेतील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला असला, तरी मतदानाची निर्धारीत वेळ संपेपर्यंत मतदान केंद्र तसेच गावात कोणताच तणाव निर्माण झाला नाही. दोन्ही मतदान केंद्रांवर तर दिवसभर सामसूम होती आणि नागरिकही आपल्या दैनंदिन कामात व्यग्र होते. गावातील मुलभूत प्रश्‍न सोडवण्याकडे प्रत्येकवेळी आमदार आणि सरकारकडून उपेक्षा होत आली आहे. त्यामुळे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे डोळे उघडण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्यावाचून नागरिकांसमोर पर्याय नव्हता, असे संतोष म्हावळिंगकर, रामदास म्हावळिंगकर, सोमा म्हावळिंगकर, भरत गावकर आदी नागरिकांनी सांगितले.   

दक्षिण गोव्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला -

मागील कित्येक वर्षांपासून म्हावळिंगेवासीय आपल्या मागण्यांसाठी आवाज करीत आहेत. मात्र, गावातील रस्ते प्रमुख प्रश्‍नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. असा नागरिकांचा दावा आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. मागील मार्च महिन्यात निश्‍चित केलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय म्हावळिंगेवासियांनी घेतला होता. प्रचार अंतिम टप्प्यात पोचला असतानाच, म्हावळिंगेवासीयांनी त्यावेळी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकप्रतिनिधींसमोर प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, कोविड संकटामुळे शेवटच्या क्षणी निवडणूक स्थगित करावी लागल्याने, त्यावेळी निर्माण झालेला गुंता सुटला होता. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेवून रस्त्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली होती. मात्र, आश्वासनाव्यतीरिक्‍त काहीच निष्पन्न झालेले नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. ‘रस्त्याच्या दुरावस्थेमुळे म्हावळिंगेवासीय संतप्त निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची तयारी'' अशा आशयाचे वृत्तही कालच ता. ११ रोजीच्या दै. ‘गोमन्तक’मधून प्रसिध्दही झाले होते.  

वरिष्ठ अधिकारी म्हावळिंगेत!
म्हावळिंगेतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळताच, उत्तर गोव्याचे अतिरीक्‍त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर आणि वासुदेव शेट्ये, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार तथा सहायक निवडणूक अधिकारी प्रवीणजय पंडित आदी अधिकाऱ्यांनी म्हावळिंगे गावात भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. या अधिकाऱ्यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्नही असफल ठरला. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सकाळी काही नागरिक मतदान केंद्रापासून काही अंतरावर एकत्रित आले होते. मात्र, पोलिस फौजफाटा येताच, हे नागरिक तेथून पांगले. नंतर मात्र नागरिक मतदान केंद्राच्या बाजूने फिरकलेच नाहीत. सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान केंद्राजवळ पोलिस तैनात होते.  

रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार
म्हावळिंगे ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला. परंतु रस्त्यासाठी जी जागा पंचायतीला हवी ती खासगी मालकीची होती. त्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला जागा मालक जे. राजेभोसले यांच्याकडून ना हरकत दाखला कोरोनाच्या काळात वेळेत घेण्यास विलंब झाला. राजेभोसले यांनी ना हरकत दाखला दिला असून काही आठवड्यात रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

संबंधित बातम्या