वीज खात्यातील कामचुकारांना सक्तीने सेवानिवृत्ती

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २९ जणांना वीज खांबावर चढणे जमत नव्हते त्यांना सेवेत घेतले नाही.

पणजी

वीज खात्यात अनेक कर्मचारी काम करत नाहीत. त्यांना सेवानिवृत्ती द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. त्यांना सक्तीने निवृत्ती द्यावी, असे मत वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते आज आले असता त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या २९ जणांना वीज खांबावर चढणे जमत नव्हते त्यांना सेवेत घेतले नाही. कामावर असलेले अनेकजण वीज खांबावर चढू शकत नाहीत. ते दुसरे काम द्या असे म्हणतात. अशांना सक्तीने निवृत्त केले पाहिजे. मात्र नियमच असे आहेत की अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येत नाही.निलंबित करून बडतर्फ केलेला एक तरी कर्मचारी दाखवा. यावरून सरकारी नोकरी काम न करण्याचे अभय असे होऊन बसले आहे. सर्वांनी काम केले पाहिजे, अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतले पाहिजे.
या महिन्याच्या एक तारखेला हॉटेल व्यावसायिकांना वीज बिले पाठवली नाहीत. दर महिन्याच्या एक तारखेला तशी बिले पाठवण्याची पद्धत होती अशी माहिती देऊन ते म्हणाले, मुख्यमंत्री याबाबत जे काही
सांगतील तसे केले जाईल. घरगुती वीज ग्राहकांनी वीज लोड वाढवून न घेता घरात वातानुकूलन यंत्रे बेकायदा बसवली आहेत. यामुळे फिडर बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. घरगुती वीज ग्राहकांना त्यामुळे या काळात सूट दिली जाणार नाही.

 

 

संबंधित बातम्या