वास्को परिसरात चिंता वाढली

dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

भाजपचे आमदार - मंत्री वास्को लॉकडाऊनची मागणी करीत आहेत. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घाबरण्याचे कोणतेच कारण नाही असा विश्वास गोवेकरांना दाखवित असतानाच वास्को शहर परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी सडा, बायणा, मांगोरहिल, नवेवाडे, खारवीवाडा या शहर परिसरातील गावात २७ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

मुरगाव
कोरोना विषाणूचा प्रसार मुरगाव तालुक्यातील विविध भागात झपाट्याने वाढला आहे. मांगोरहिलनंतर झुआरीनगरात रुग्णांची संख्या ८४ झाली आहे. शुक्रवारी बायणात १२ रुग्ण आढळले. त्यामुळे तेथील रुग्णांची एकूण संख्या ६६ झाली आहे.
सडा भागातही रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुरगाव बंदराला लागून असलेल्या सडा भागात कोरोनाचा फैलाव वाढलेला आहे. विशेषतः प्रभाग ४ मध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले म्हणून तो प्रभाग मायक्रो कंटेंनमेंट झोन म्हणून प्रशासनाने जाहीर केला आहे. सडा भागात रुग्ण संख्या ६५ झाली आहे.
वास्को शहरातील खारवीवाडा परिसरात ६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या भागातील नगरसेविका पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. याशिवाय याच भागातील एका व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झालेले आहे. त्यामुळे खारवीवाडा भागातील लोक घाबरलेले आहेत. या भागात आतापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत.
नवेवाडे परिसरातही दररोज रुग्णांची भर पडत आहे. सद्यस्थितीत ३७ रुग्ण नवेवाडेत आढळले आहेत. मांगोरहिल परिसरातही ५ नव्या रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत मांगोरहिलमधील २४५ पॉझिटिव्ह रुग्ण विविध ठिकाणच्या कोविड उपचार केंद्रात उपचार घेत आहेत.

Goa Goa Goa Goa Goa Goa

 

संबंधित बातम्या