सांगेतील स्मशानभूमीची स्थितीच ‘सरणा’सारखी!

सांगेतील स्मशानभूमीची स्थितीच ‘सरणा’सारखी!

सांगे 

सांगे तालुका हा निसर्गसंपन्न व थंड वातावरणाचा तालुका. ह्या तालुक्याचे क्षेत्र ग्रामीण भागाने अधिक विस्तारल्याने येथील लोकवस्ती डोंगराळ भागातही दिसून येते. विकासात्मकदृष्ट्या सांगे तालुका महत्त्वाचा असल्याने ‘मुक्तिधाम’ (स्मशानभूमी) यांचीही स्थिती चांगली असणे क्रमप्राप्त ठरते. परंतु सांगे पालिका क्षेत्रातील स्मशानभूमीत सद्यःस्थितीत तसे चित्र नाही. स्मशानभूमीच्या बाजूला झाडे-झुडपे व गवत वाढले असल्याने या ठिकाणी स्वच्छता झालेली नसल्याचे स्पष्ट होते. शिवाय अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींना भगदाड पडल्याने आतमध्ये कुत्री येण्याचाही प्रकार घडत आहे. त्यामुळे या स्मशानभूमींचे व त्या परिसराचे नावाप्रमाणे ‘स्मशान’ बनलेले आहे. 
सांगे पालिकेच्या दोन स्मशानभूमी आहेत. त्यापैकी एक गुणेभाट व दुसरी वाकर तारीपांटो या ठिकाणी आहे. दोन्ही स्मशानभूमींची दुर्दशा झालेली आहे.. त्या मानाने सरकारी निधीतून मुस्लिम धर्मियांसाठी कबरस्थान आणि ख्रिस्ती धर्मियांसाठी दफनभूमी चांगल्या प्रकारे सजविण्यात आलेल्या आहेत. असे असताना पालिकेच्या हिंदू स्मशानभूमी आजही ओसाड पडलेल्या आहे. कोणत्याही पद्धतीची सुरक्षा आखण्यात आलेली नाही. भटकी कुत्री, गुरे राजरोस स्मशानात भटकत असतात. स्मशानात सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना अद्याप आखण्यात आलेली नसल्याने अंत्यसंस्कारावेळी अडचणीचे ठरत आहे. 
सांगे नगरपालिकेच्या स्मशानभूमीची सुधारणा घडवून आणण्यासाठी अद्याप प्रयत्न झालेले नाहीत. पालिकेने पुढाकार घेऊन तसा प्रयत्न केलेला नाही. लाकूड साठवून ठेवण्यासाठी गोदाम आहे. पण, गोदामात लाकूड नसते. ज्या कोणाचे निधन झाले, त्याच्या नातेवाईकांना धावाधाव करून वकारीतील लाकूड फाटा आणावा लागतो. कित्येकवेळा जळाऊ लाकूड ओले असल्याने प्रेत पूर्ण जळले जात नाही. दुसऱ्या दिवशी त्या घरातील माणूस सकाळी स्मशानात जाईपर्यंत भटकी कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भाग घेऊन स्मशानाबाहेर येतात. हा प्रकार यापूर्वी सांगे पालिकेच्या स्मशानभूमीत घडलेला आहे. 

पंचायत क्षेत्रांत मोठ्या स्मशानभूमी, पण..! 
उगे पंचायत क्षेत्रातील उगे येथे जिल्हा पंचायत निधीतून स्मशानभूमीची व्यवस्था केलेली आहे. वालकीणी, वाडेकुर्डी या ठिकाणीही स्मशानभूमी आहे, पण देखरेख समिती नसल्याने या स्मशानभूमीतही सुविधांचा अभाव दिसून येतो. स्थानिक लोकांनाच सर्व व्यवस्था करावी लागते. ग्रामीण भागात स्मशानभूमी नसली तरीही पूर्वीपासून ठरलेल्या जागेत अंत्यसंस्कार केले जात आहे. गावाच्या रीती रिवाजप्रमाणे ठरलेल्या जागीच संस्कार केले जात असतात. कित्येक ठिकाणी अजूनही स्मशानभूमी नाही, तरीही गावातील लोक कोणत्याही कटकटीविना अंत्यसंस्कार करतात. 


मेशु डिकॉस्ता यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष 
मृतदेहाची होणारी परवड व त्यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी सांगेतील सामाजिक कार्यकर्ते मेशु डिकॉस्ता यांनी सांगे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. पण, दोन वर्षे उलटूनही पालिकेकडून उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्मशानभूमीत स्वच्छता नाही आणि सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. वाकर-तारीपांटो येथील स्मशानभूमीचीही तीच स्थिती आहे, त्यामुळे या स्मशानभूमींना ऊर्जितावस्था मिळणे गरजेचे आहे. 

स्मशानभूमींसाठी सुरक्षा उपाय म्हणून कंपाउंड बांधण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. पण कंत्राटदार मिळाले नाहीत. शिवाय नूतनीकरण करण्यासाठी ‘सूडा’मार्फत पत्र व्यवहार करण्यात आला होता. पण, अद्याप हालचाली झालेल्या नाहीत. आता परत एकदा याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. 
- केरोज क्रूज (नगराध्यक्ष - सांगे पालिका) 

सरकारने मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांच्या कब्रस्थान आणि दफनभूमीत उत्तमरित्या सोयी केलेल्या आहेत. या सोयींप्रमाणेच हिंदूंच्या स्मशानभूमीत सोयी व्हाव्यात. दोन वर्षांपूर्वी पालिकेला निवेदन देण्यात आले होते. पण, अद्यापही काहीच उपाय योजना आखण्यात आलेली नाही. भटक्या कुत्र्यांकडून अर्धवट जळालेल्या मृतदेहाची विटंबना होणे, हे दुर्दैवी आहे. 
- मेशु डिकॉस्ता (सामाजिक कार्यकर्ता) 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com