सरकारी कार्यालयांमध्ये सामाजिक अंतराचा सावळागोंधळ 

विलास महाडिक
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत मास्क व सामाजिक अंतर ठेवण्याची सक्ती करण्यात आली असली तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सरकारच्याच कार्यालयांमध्ये होत नाही.

पणजी

राज्यात सध्या ‘कोरोना’ने थैमान मांडले आहे अशा परिस्थितीत अनेक शहरे व गावे ही ‘कन्टोन्मेंट झोन’ घोषित केली जात आहेत. मास्क वापरण्याची व सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या जात आहेत मात्र सरकारी कार्यालयांमध्ये सामाजिक अंतराचा सावधागोंधळ आहे. कोरोना भीतीमुळे कर्मचारी वर्ग फाईल्स हाताळताना तणावाखाली काम करत आहेत मात्र सनदी अधिकारी हे फाईल्स निर्जंतुकीकरण करून हाताळत आहेत अशी परिस्थिती आहे. 
कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत मास्क व सामाजिक अंतर ठेवण्याची सक्ती करण्यात आली असली तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सरकारच्याच कार्यालयांमध्ये होत नाही. सर्व कर्मचाऱ्यांना दरदिवशी ड्युटीवर उपस्थितीचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमधील बसण्याच्या व्यवस्थापासून सामाजिक अंतर एक फूट सुद्धा नसते. हे कर्मचारी राज्यातील सर्व भागातून कामाला येतात त्यात काहीजण हे कन्टोन्मेंट झोनमधीलही असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येच एकमेकापासून कोरोना संसर्ग होण्याची भीती मनामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येजण तणावाखाली काम करत आहेत. हे कर्मचारी खात्यातील अनेक फाईल्स हाताळत असतात त्या अनेक कर्मचाऱ्यांकडून एकमेकाजवळ येत असतात. वारंवार निर्जंतुकीकरण कर्मचारी करतात मात्र कोरोना विषाणू कोणत्या मार्गाने बाधित करील याचा नेम नाही याचा संशय कर्मचाऱ्यांना भेडसावू लागला आहे. 
सरकारी खात्यातील फाईल्स या कर्मचारी वर्गाकडून अधिकाऱ्यांकडे निर्णय घेण्यासाठी जातात. मात्र या फाईल्स काही दिवस टेबलावर
पडून असतात. या फाईल्सच्या निर्जंतुकीकरणासाठी काही सनदी अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांकडून काढलेल्या ‘सॅनिटायझर्स’ उपकरणे याची प्रात्यक्षिकेही पाहून ती सरकारी खर्चातून खरेदी करण्याची सूचना केली आहे. काही सनदी अधिकारी हे फाईल्स हे स्वतःहून या फाईल्स काही दिवस हाताळत नाहीत. त्या फाईल्स कोरोना विषाणू असल्यास तो त्यातून नष्‍ट होईल असा समज करून ती चार ते पाच तशीच ठेवतात. ही फाईल हाताळताना हे अधिकारी स्वतः उघडत नाहीत तर आपल्या कार्यालयातील शिपायाला फाईल्सची पाने पलटण्यास सांगतात. हे अधिकारी कागदाला हात न लावताचा लेखी टिप्पणी नोंदवतात अशी माहिती मिळाली आहे. यावरून सरकारी
अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाने जीव धोक्यात घालून काम करायचे तर सनदी व इतर अधिकाऱ्यांनी मात्र स्वतःला जपताना इतर कर्मचाऱ्यांबाबत विचार करत नसल्याने कर्मचारी वर्गामध्ये नाराजी आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये काहीजण निवृत्त होण्याच्या वाटेवर आहेत मात्र त्यांनाही ड्युटीवर येण्याची सक्ती केली जात आहे. 
सरकारी कार्यालयामध्ये वैयक्तिक कामासाठी जाणाऱ्या लोकांना बराच सहन करावा लागत आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरूनच या लोकांना महत्त्वाचे काम असतानाही अधिकाऱ्यांना भेटण्यास दिले जात नाही. प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांना भेटता येणार नाही असे सांगून परत पाठवतात. पोलिस स्थानकातील कर्मचारी कोरोना बाधित होत असल्याने प्रत्येक पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच तक्रारी स्वीकारण्यासाठी लोकांना ताटकळत उभे राहण्याची पाळी येते. तक्रारींची दखल घेण्यासही विलंब होत असल्याने लोकांमध्ये संताप आहे. 
कोरोनापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा तसेच स्वच्छता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे मात्र सरकारी कार्यालयामध्ये असलेली शौचालयांची स्थिती खूपच गंभीर आहे. या शौचालयाच्या स्वच्छतेकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही. काही खात्यामध्ये महिला व पुरुषांसाठी एकच शौचालय आहे तेथे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा वापर अनेक कर्मचारी वर्ग करत असल्याने त्याचे निर्जंतुकीकरणही केले जात नसल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शक्यता नाकारता येत नाही. 
 

 

संबंधित बातम्या