भाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना रुग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर

Amarnath panjikar.jpg
Amarnath panjikar.jpg

पणजी: भाजप सरकारने 2 हजार 840 कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारकडून ही आकडेवारी अधिकृतरीत्या आता जाहीर झालेली असली तरी मार्च 2020 पासून गोव्यातील सर्व मृत्यूंची तसेच सरकारच्या कोविड हाताळणी व व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळून सरकारला चुकीचे सल्ले देणारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गठीत केलेली तज्ज्ञांची समिती त्वरित बरखास्त करण्याबरोबरच आरोग्यमंत्री राणे यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोमंतकीय जनतेची व कॉंग्रेस पक्षाची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. (Congress' Amarnath Panjikar has blamed the BJP for the deaths of Covid19 patients in Goa)

पत्रकार परिषदेला महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर व सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर उपस्थित होते. पणजीकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देऊन निष्पक्ष सरकारच्या कोविड हाताळणी व व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशीसाठी वाट मोकळी करावी. कोविड संसर्गाची लागण झालेल्यांची आकडेवारी व मृतांचा आकडा यात सरकारने सुरवातीपासून घोळ घातला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी नसताना सरकारने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्याचे ठरविले. यावरुन भाजप सरकार कोविड हाताळणी व व्यवस्थापनांत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. सरकारने जाणीवपूर्वक रुग्णांना कोविड मृत्यूच्या जबड्यात ढकलले. आरोग्यमंत्र्यांनी गोव्याचा ‘प्रयोगशाळा’ म्हणून वापर करताना गोमंतकीय रुग्णांना ‘गिनी पिग’ केले. 

नाईक म्हणाल्या, भ्रष्ट भाजप सरकारने शेकडो लोकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बळी गेल्या नंतरही गोमेकॉत आक्सिजन प्रकल्प अजूनही कार्यान्वित केला नाही हे धक्कादायक आहे. सरकारची असंवेदनशीलता यातून उघड होते. भाजपने आपल्या नाकर्तेपणाने निष्पापांचे बळी घेत हजारो संसार उध्वस्त केले व अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचुर केला. 

म्हार्दोळकर म्हणाले, सरकार कोविड लसीचा योग्य साठा मिळवू शकत नाही. असे असताना खासगी इस्पितळांना वेगवेगळ्या उत्पादकांच्या लसी कशा उपलब्ध होतात हे सरकारने जनतेला सांगावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपाई म्हणून कोविड मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेले प्रत्येकी रुपये 4 लाख रुपये तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले रुपये 2 लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये आजपर्यंत किती कुटुंबियांना वितरीत करण्यात आले याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावा. सरकारने त्वरित व कोणत्याही अटीविना सदर रक्कम मृतांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करावी अशी मागणी ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केली.

किर्लपालकर म्हणाले, कोविड महामारीत कॉंग्रेस पक्षाने कोणतीच जाहिरातबाजी न करता लोकांची सेवा केली व गरजवंताना मदतीचा हात दिला. लोक संकटात असताना व हजारो कुटुंबिय शोक सागरात बुडाले असताना भाजपचे सर्व मंत्री व पदाधिकारी केवळ उत्सव साजरे करुन जाहिरातबाजी करण्यात व्यस्त राहिले. 

वरकमाईसाठीच हट्ट...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा कोविडसाठी वापर करणे बंद करण्याचे दिलेले निर्देश म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना धक्का आहे. 22 कोटी 50 लाख रुपयांच्या या गोळ्यांच्या खरेदीवर वरकमाई करण्यासाठीच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी या गोळ्यांचे वाटप करण्याचा हट्ट धरला होता, हे आता उघड झाल्याचा दावा पणजीकर यांनी केला आहे. गोमंतकीयांनी भाजपच्या गैरकारभाराची आठवण ठेवावी व आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा, अशी विनंती या कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com