म्हादई संपवण्याचे काँग्रेस-भाजपचे षडयंत्र

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्याने गोव्यातील जनता पेटून उठण्याची गरज आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय राजकीय पक्षांनी म्हादईला गोव्यातून संपवण्याचे षड्यंत्र आखले आहे, असा आरोप प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवातर्फे सुरू केलेल्या ‘म्हादई बचाव गोवा बचाव’चे नेते ह्रदयनाथ शिरोडकर यांनी दिला.

पणजी:  कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्याने गोव्यातील जनता पेटून उठण्याची गरज आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय राजकीय पक्षांनी म्हादईला गोव्यातून संपवण्याचे षड्यंत्र आखले आहे. म्हादई बचावसाठी लोकचळवळ महत्वाची आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी हे कर्नाटकचे असून त्यांनी म्हादईचे पाणी वळविण्यासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे राव यांनी गोव्यात पुन्हा विचार करूनच यावे असा इशारा प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवातर्फे सुरू केलेल्या ‘म्हादई बचाव गोवा बचाव’चे नेते ह्रदयनाथ शिरोडकर यांनी दिला.

म्हादईचा नैसर्गिक प्रवाह जसा आहे तसा त्याला न अडवता सुरू ठेवण्यात यावा अशी गोमंतकियांची भूमिका आहे. कोणीही हा प्रवाह अडवून पाणी वळवण्याचा प्रयत्न करू नये. जसे कर्नाटकातील सर्व राजकीय पक्षांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून म्हादईचे पाणी वळवण्यास एकत्रित आले तशी एकजूट गोव्यातूनही राजकीय पक्षांनी दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेना मगो, गोवा फॉरवर्ड व आम आदमी या पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट करायला हव्यात.

आतापर्यंत प्रोग्रेसिव्ह फ्रँट ऑफ गोवातर्फे राज्यात विरोध होत असलेल्या मोले प्रकल्प, कोळसा हब तसेच दुपदरी रेल्वे मार्ग तसेच म्हादईप्रश्‍नी सुमारे १४ आमदारांशी संपर्क साधला त्यांनी या प्रकल्पांना विरोध आहे असे मत व्यक्त केले आहे. काहींनी मत व्यक्त करण्यास नकार दिला तर काहींनी या वादात आपल्याला पडायचे नाही असे स्पष्ट केले आहे. यावरून या आमदारांना म्हादईचे पाणी जरी कर्नाटकने वळविले तरी त्यांना कोणतेच सोयरसुतक नाही. या आमदारांचा पर्दाफाश केला जाणार आहे.

कर्नाटकमध्ये म्हादई पाणी वळविण्यासाठी आंदोलनात असलेले काँग्रेसचे गोवा प्रभारी राव यांना गोव्यात येण्याचे धाडसच कसे झाले असा प्रश्‍न शिरोडकर यांनी केला. 
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असूनही गोव्याकडील म्हादईचा प्रवाह रोखण्यात आला आहे तो खुला करण्यास राज्य सरकारला अपयश आले आहे. गोवा भाजप सरकारने म्हादईचा सौदा केला आहे. म्हादईबाबत कर्नाटकचे पारडे जड आहे व केंद्र सराकरचेही त्यांच्या बाजूनेच झुकते माप आहे. राज्यात भाजप सरकार उरले तरी म्हादई गोव्याच्या हातातून निसटल्यात जमा आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी राव यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे तर त्यांनी पुन्हा गोव्यात येऊनच दाखवावे. जी स्थिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची केली होती त्यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती त्यांची केली जाईल असा इशारा शिरोडकर यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या