काँग्रेसच्या ‘ट्रॅक्‍टर रॅली’ला प्रतिबंध; कार्यकर्ते संतप्त

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात कॉंग्रेसतर्फे आयोजित केलेल्या ‘ट्रॅक्‍टर रॅली’ला पोलिसांनी प्रतिबंध केल्याने डिचोलीत कॉंग्रेस कार्यकर्ते संतप्त बनले व त्यामुळे बराचवेळ गदारोळ माजला.

डिचोली :  केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात कॉंग्रेसतर्फे आयोजित केलेल्या ‘ट्रॅक्‍टर रॅली’ला पोलिसांनी प्रतिबंध केल्याने डिचोलीत कॉंग्रेस कार्यकर्ते संतप्त बनले व त्यामुळे बराचवेळ गदारोळ माजला. रॅलीला परवानगी नसल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी रॅली काढण्यास हरकत घेत तासभर रॅली रोखून धरली, तर आम्ही शेतकऱ्यांच्या हितार्थ लोकशाही मार्गाने रॅलीचे आयोजन केले असून रॅलीसाठी आवश्‍यक यंत्रणेकडे परवानगीही मागितली होती, असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमकही झडली. दुसऱ्या बाजूने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ आदी घोषणांचा नारा चालू ठेवला.

प्रारंभी रॅली रोखूनच दाखवा, असे आव्हानही अमरनाथ पणजीकर, विजय भिके, प्रवीण ब्लेगन, मेघ:श्‍याम राऊत दिलीप धारगळकर आदी कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर वातावरणही हळूहळू तप्त झाले. संयुक्‍त मामलेदार श्रीपाद माजीक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाल्यास आमच्या विरोधात अवश्‍य कारवाई करा. आम्हाला अटक केली तरी चालेल, मात्र, सरकारच्या दबावाला घाबरून आम्ही मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला. कार्यकर्ते माघार घेत नसल्याचे दिसून येताच अखेर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सूचना पोलिसांनी केली आणि तासाभराच्या गदारोळानंतर कार्यकर्त्यांनी रॅलीला सुरवात केली.  जुन्या बसस्थानकावरून नवीन बसस्थानकाच्या दिशेने जाताना कार्यकर्त्यांनी रॅलीत गर्दी केल्याने रॅली जुन्या बाजाराजवळ पुन्हा अडवण्यात आली. अखेर कार्यकर्ते गटागटाने पांगले. नंतर बगलमार्गावरुन अस्नोड्याच्या दिशेने रॅली म्हापशाकडे जाण्यास मार्गस्थ झाली. या रॅलीत टॅक्‍टरसह कार्यकर्ते सहभागी झाले. डिचोलीचे संयुक्‍त मामलेदार श्रीपाद माजीक हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. तर डिचोलीचे पोलिस उपअधिक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर, वाळपईचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर हाती घेतलेल्या मोहीमेचा भाग म्हणून रविवारी डिचोलीतून या ट्रॅक्‍टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पोलिसांतर्फे प्रतिबंध करण्यात येणार असल्याची कुणकुण कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लागली होती. तरीदेखील रॅलीनिमित्त कार्यकर्ते शहरातील जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमले होते. या रॅलीत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर, प्रदेश युवा कॉंग्रेसचे ऍड. वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेसचे सरचिटणीस संकल्प आमोणकर, अमरनाथ पणजीकर,उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा समितीचे अध्यक्ष विजय भिके आणि जोसेफ डायस  डिचोली गट कॉंग्रेसचे अध्यक्ष मेघ:श्‍याम राऊत, युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक, नझीर बेग, प्रा. दिलीप धारगळकर, साखळी गट कॉंग्रेसचे अध्यक्ष मंगलदास नाईक, वाळपई गट कॉंग्रेसचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, जयदेव परब गावकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीची थट्‌टा असल्याचे मत गिरीष चोडणकर यांनी व्यक्‍त करुन, सरकारचा निषेध केला. सध्याचे भाजप सरकार भ्रष्टाचारी आणि निष्क्रिय असून, हे सरकार हुकूमशाही चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमरनाथ पणजीकर, विजय भिके, प्रवीण ब्लेगन, मेघ:श्‍याम राऊत आदी कार्यकर्त्यांनी रॅलीत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याबद्‌दल तीव्र नाराजी व्यक्‍त करुन भाजप सरकारवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या