वीज बिलाबाबत सरकारने जनतेला फसवू नये: संकल्प आमोणकर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीजमंत्री नीलेश काब्राल हे जोपर्यंत वीज बिले माफ करीत नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून, शुक्रवारी (ता. २१) वास्कोतून पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुरगाव: गोमंतकीय जनता सुज्ञ असल्यामुळे सरकार जनतेला वेठीस धरू शकत नाही. वीज बिलात ५० टक्के सवलत दिल्याचा हा सरकारचा केवळ बहाणा आहे, असा आरोप करून गोमंतकीय जनतेला का म्हणून फसवता असा प्रश्‍न गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीजमंत्री नीलेश काब्राल हे जोपर्यंत वीज बिले माफ करीत नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून, शुक्रवारी (ता. २१) वास्कोतून पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेला मुरगाव गट काँग्रेस अध्यक्ष महेश नाईक, शंकर पोळजी, सचिन भगत, रशीद सय्यद आदी उपस्थित होते. सरकारने टाळेबंदीच्या काळात वाढविण्यात आलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले होते. आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याची दखल घेऊन सरकारने दोन महिन्यांच्या वीज बिलात ५० टक्के सवलत दिल्याची घोषणा केली होती. पण, ही सवलत वीज बिलातील फिक्सड चार्जेसवर असल्याचे उघड झाल्यावर सरकारने वीज ग्राहकांची घोर थट्टा केल्याचे स्पष्ट झाले. सिंगल फेज ग्राहकांना १२ रुपये ५० पैसे तर ट्रीपल फेज ग्राहकांना ३० रुपये प्रति महिना अशी दोन महिन्यांची सवलत दिली. एकेका ग्राहकांना दोन महिन्यांचे हजारो रुपयांचे बील सरकारने माथी मारले आहे आणि त्याबदल्यात दोन महिन्यांची सवलत म्हणून २५ ते ६० रुपये देण्याची घोषणा केली. हा प्रकार निव्वळ जनतेला खुळे ठरवून थट्टा करण्यासारखा आहे, असा आरोप आमोणकर यांनी केला. सरकारने जनतेची चालवलेली थट्टा थांबवून काँग्रेस पक्षाने वीज सवलतेसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकाची निवड करून जनतेला सहानुभूती, दाखवावी अशी मागणीही त्यांनी केली.

...तर आंदोलनस्थळीच जनतेला उत्तर द्या
वीज बिलांची रक्कम वाढवलेली नाही, त्यासाठी आपण चर्चेस तयार असल्याचे सांगणारे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी उद्या (शुक्रवारी) वास्कोत आयोजित केलेल्या आंदोलनस्थळी उपस्थित राहून जनतेला उत्तर द्यावे, असे खुले आव्हान संकल्प आमोणकर यांनी वीजमंत्री काब्राल दिले. वीज बिले वाढ प्रकरणाच्या आंदोलनाची सुरवात काँग्रेस पक्षाने करून गोव्यातील वीज ग्राहकांना जागृत केले. पण, आता उद्यापासून छेडण्यात येणारे आंदोलन जनतेचे राहणार असून, सरकारने आपली बाजू जनतेसमोरच मांडावी, असे आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केरळ, दिल्लीच्या धर्तीवर संपूर्ण वीज बिल माफ करा
‘कोरोना’ काळात टाळेबंदी लागू केली. त्यामुळे लोकांनी विजेचा वापर अधिक केला आणि म्हणूनच बिल वाढले, असा निष्कर्ष सरकारकडून काढला जात आहे. ही टाळेबंदी सरकारने घोषित केली होती. त्यामुळे लोकांना घरात बंदिस्त होऊन राहावे लागले. यात जनतेची काय चूक होती, असा सवाल संकल्प आमोणकर यांनी उपस्थित करून केरळ, दिल्ली सरकारने टाळेबंदी काळातील संपूर्ण वीज बिल माफ करून लोकांना सवलत दिली. त्याप्रमाणेच गोवा सरकारनेही संपूर्ण वीज बिल माफ करावे, अशी मागणी आमोणकर यांनी केली.

काँग्रेसने सरकारला दिलेले पर्याय...
काँग्रेस पक्षाने आपल्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनाची सांगता करताना पणजीत विद्युत भवनमध्ये मुख्य अभियंत्यांना पक्षाने निवेदन सादर केले होते. त्यात वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी चार पर्याय सादर केले होते. टाळेबंदी काळातील एप्रिल-मे या दोन महिन्यांचे पूर्ण बील माफ करणे, पाच हजार रुपयांहून अधिक बील असलेल्यांना ५० टक्के सवलत देणे, पाच हजारांपेक्षा कमी असलेली बीले माफ करणे किंवा फेब्रुवारी महिन्यात आलेल्या बिलांनूसार वीज बिले आकारावी असे हे पर्याय होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या