सासष्टीत काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

वेगवेगळ्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापत असताना सासष्टीत काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. विद्यमान आमदारांसह इतर मतदारसंघांतील या संभाव्य उमेदवारांना पक्षातर्फे प्रोजेक्ट करण्यात येत आहे. 

मडगाव :  वेगवेगळ्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापत असताना सासष्टीत काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. विद्यमान आमदारांसह इतर मतदारसंघांतील या संभाव्य उमेदवारांना पक्षातर्फे प्रोजेक्ट करण्यात येत आहे. 

मडगावात दिगंबर कामत, नावेलीत लुईझिन फालेरो व कुडतरीत रेजिनाल्ड लॉरेन्स हे विद्यमान आमदार असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे. नुवेत माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा व वेळ्ळीत दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानण्यात येत आहे, तर कुंकळ्ळीत माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांचे पुत्र युरी आलेमाव हे संभाव्य उमेदवार असतील असे संकेत आहेत. बाणावलीत माजी आमदार कायतान सिल्वा, जिल्हा पंचायत सदस्य मारिया रिबेलो, बाणावलीच्या माजी सरपंच रॉयला फर्नांडिस, गाब्रियल पिंटो, डिक्सन वाझ अशी नावे पुढे येत आहेत. फातोर्डातील उमेदवारीबद्दल मात्र काँग्रेसने अद्याप गुप्तता पाळली आहे. 

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा राजकीय विजनवासात होते. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. काँग्रेसच्या कार्यक्रमांत व्यासपीठावर ते सतत दिसत आहेत. चांदर येथे कोळसा विरोधी आंदोलनातही ते सहभागी झाले होते. आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्याने नुवे मतदारसंघात काँग्रेससाठी नवीन उमेदवाराची गरज होती. ही गरज ओळखून काँग्रेस सध्या सिक्वेरा यांना उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत आहे. 

आमदार क्लाफास डायस यांनी भाजपात प्रवेश केल्याने कुंकळ्ळी मतदारसंघातही नवीन उमेदवारासाठी संधी निर्माण झाली. या संधीचा लाभ उठवण्यासाठी ज्योकीम आलेमाव व त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांनी काँग्रेसशी जवळीक साधली. त्यापूर्वी दीडेक वर्ष आलेमाव पिता - पूत्र गोवा फॉरवर्डशी संलग्न होते. युरी आलेमाव यांनी गोवा फॉरवर्डचे कुंकळ्ळीत कार्यालयही सुरू केले होते. तथापि, क्लाफास डायस यांच्यासह काँग्रेसचे दहा आमदार फुटल्यानंतर काँग्रेसला कुंकळ्ळीत नवीन उमेदवाराची गरज निर्माण झाल्याने ज्योकीम आलेमाव व युरी आलेमाव यांनी काँग्रेसच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ज्योकीम आलेमाव यांनी आपण आधीपासूनच काँग्रेसमध्येच असल्याचे जाहीर केले होते, तर युरी आलेमाव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. चांदर येथील कोळसा विरोधी आंदोलनात युरी आलेमाव हे कामत यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. येत्या आठ दिवसांत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी काँग्रेसला हात दाखवून भाजपात प्रवेश केल्याने वेळ्ळी मतदारसंघातही नवीन उमेदवाराला संधी मिळणार आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये असलेले ज्यो डायस यांनी यावेळी आपली हॅट उमेदवारीच्या रिंगणात फेकली आहे. काँग्रेसकडूनही तेच संभाव्य उमेदवार असतील असे संकेत देण्यात येत आहेत. 
बाणावलीत काँग्रेस उमेदवारीसाठी माजी आमदार कायतान सिल्वा, मारिया रिबेलो, रॉयला फर्नांडिस, डिक्सन वाझ व गाब्रियल पिंटो यांची नावे चर्चेत आहेत.

संबंधित बातम्या