'म्हादई प्रश्नी दोन दिवसांत कृती आराखडा जाहीर न केल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आल्यावर म्हादई प्रश्नी न बोलता या प्रश्नावर स्वत: मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे

मडगाव - गोव्यातील भाजप सरकारने केंद्राच्या दडपणाखाली म्हादई विकल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. म्हादई वाचवण्यासाठी आणि कर्नाटकात वळविलेले पाणी पुन्हा गोव्यात आणण्यासाठी सरकारने कृती आराखडा स्पष्ट करावा, असे आव्हान दिले. तसे जमत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आल्यावर म्हादई प्रश्नी न बोलता या प्रश्नावर स्वत: मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

म्हादईबाबत राज्य सरकारकडे लपविण्यासारखे काही नसेल तर केंद्रीय मंत्र्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे का टाळले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'दोन दिवसात जर मुख्यमंत्री कृती आराखडा सादर करू शकले नाहीत तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विधानसभाही बरखास्त करावी. पुढची निवडणूक म्हादई प्रश्नावर होऊ देत. उगीच आम्ही लोकांबरोबर आहोत, असे सांगून वेळ मारून नेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. केंद्र सरकार तुमचे ऐकत नसेल तर राजीनामा द्या आणि म्हादईसाठी पुन्हा रिंगणात उतरा, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले आहे. राज्यातील हे कुचकामी सरकार बरखास्त करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व गोवावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पाणी तंटा लवादाने कर्नाटकाला पिण्यासाठी पाणी देण्याची परवानगी देताना हे करण्यापूर्वी गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील तज्ज्ञांची समिती नेमावी, असे सांगितले होते. परंतू, ही समिती नेमण्यापूर्वीच कर्नाटकाने पाणी वळवले आहे. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, या महत्वाच्या प्रश्नावर गोवा सरकार मागील महिनाभर ब्र शब्द देखील काढत नाही. या सरकारमधील मंत्री निलेश काब्राल मात्र या प्रश्नावर आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगत आहेत. याला तुमचा दुतोंडीपणा म्हणावा का, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

म्हादई आपल्या आईसारखी आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण प्रधानमंत्री मोदी यांच्याशी चर्चा झाल्यावर ते या संबंधी एकही शब्द बोलत नाहीत. त्याउलट त्यांचा सहभाग गोव्यातील बेकायदेशीर खनिज व्यवसायात असल्याने फक्त खनिज व्यवसाय गोव्यात कसा सुरू केला जाऊ शकतो, यावर बोलून येत आहेत. यावरून आम्ही काय निष्कर्ष काढावेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना सरदेसाई म्हणाले, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीच म्हादईचे पाणी वळविण्याचा आदेश दिला. त्यांनीच मोले नष्ट करणाऱ्या प्रकल्पाना मंजुरी दिली. महामारीच्या स्थितीचा फायदा उठवून या सरकारने गोवा विकायला काढले आहे. ड्रोनच्या साहाय्याने जे चित्रीकरण करण्यात आले आहे त्यातून म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविले आहे हे स्पष्टपणे दिसते. यासाठीच यंदा विक्रमी पाऊस पडूनही म्हादई केवळ ओढ्यासारखी वाहत आहे. दूधसागरही आटू लागला आहे, असे स्थानिक लोकांचे मत आहे. मात्र, गोवा सरकार डोळे झाकून गप्प बसले आहे, असा आरोप त्यांनी केला. 
 

संबंधित बातम्या