"दुहीचे राजकारण करणाऱ्या भाजपचा दक्षिण गोव्यात पराभव करा"

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान करून भाजपच्या समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाचा पराभव करावा असे आवाहन कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांनी केले आहे. 

मडगाव: गोव्याचा धार्मिक सलोखा तसेच पर्यावरणाचे जतन करणे महत्वाचे असून गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान करून भाजपच्या समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाचा पराभव करावा असे आवाहन कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांनी केले आहे. 

दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघातील उमेदवारांनी आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रांन्सिस सार्दिन तसेच दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोजफ डायस यांची भेट घेवून आगामी निवडणुकीची तयारी व रणनीती यावर चर्चा केली.
कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांचा विजय पक्का असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या बैठकीत जोजफ वाझ (राय), रोमाना रॉड्रिग्ज (नुवे), सुझी फर्नांडिस (कोलवा), ज्युलियो फर्नांडिस (वेळ्ळी), रॉयला फर्नांडिस (बाणावली), मुर्तजा ककनूर (दवर्ली), सोनिया फर्नांडिस (गिरदोली), मिशेल रिबेलो (कुडतरी), श्‍याम भांडारी (सावर्डे), अभिजीत देसाई (रिवण), हर्षद गावस देसाई (शेल्डे), राजेश वेळीप (खोला), रेश्मा वेळीप (पैंगीण), लुपिनो शावियर (कुठ्ठाळी) व प्राची नाईक (कुर्टी) हे जिल्हा पंचायत उमेदवार उपस्थित होते. 

आमचे उमेदवार प्रत्येक घरात भेट देत असून त्यांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे तसेच आमच्या सर्व उमेदवारांचा विजय नक्की असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. भाजपच्या राजवटीला जनता कंटाळली असून लोक भाजपला धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचे सांगून कॉंग्रेसची लाट गोव्यात असल्याचे कामत यांनी सांगितले. भाजप विरोधात लोकांच्या मनात राग असून भाजप उमेदवारांचा पराभव ठरलेला असल्याचे सार्दिन म्हणाले. 

सर्व मतदारसंघातील तयारी पूर्ण झाली असून आमचे बुथ स्थरावरील कार्यकर्ते पूर्ण तयारीत आहेत. मतदानाच्या दिवशी लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम ते करणार आहेत, असे डायस म्हणाले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या