काँग्रेस ही आमदार पुरवठा करणारी ‘फॅक्टरी’

Congress is a 'factory' supplying MLA's
Congress is a 'factory' supplying MLA's

पणजी:  काँग्रेस व भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांविरुद्ध आरोप - प्रत्यारोप करत असले तरी त्यांचे सेटींग आहे. काँग्रेस ही भाजपला आमदार पुरवठा करणारी फॅक्टरी आहे. भाजप सरकारचे सर्व क्षेत्रात सेटींग सुरू आहे. आठवड्याला किमान एक सेटींग होत आहे. कोरोना महामारीचा काळ मुख्यमंत्र्यांना फायदेशीर ठरला आहे. लोकाशाही राज्यात उरलीच नाही असा रोखठोक आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आत्मनिर्भर भारतच्या गोष्टी बोलत आहेत, तर महामारीच्या काळामध्ये दुसऱ्या बाजूने ‘सीआरझेड’च्या नावाखाली उदारनिर्वाह अवलंबून असलेल्या कुटुंबांची व्यावसायिक बांधकामे पाडत आहे. प्रदेश काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी गोवा भेटीत आगामी विधानसभा निवडणूक युतीविना लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे त्याचा फायदा गोवा फॉरवर्डला झाला आहे.

यापूर्वी काँग्रेसने नेहमीच आमिषे दाखवून झुलवत ठेवण्याचे प्रकार केले आहे. आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने गोव्यात त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने गोवा फॉरवर्ड पक्षही जोमाने कामाला लागणार आहे. काँग्रेस व भाजप यांच्यात असलेल्या ‘सेटींग्स’वर गोवा फॉरवर्ड पक्ष लक्ष ठेवून आहे. वेळ येईल तेव्हा या दोन्ही पक्षांचा पुराव्यानिशी पर्दाफाश केला जाईल, असा इशारा पत्रकारांशी आज बोलताना त्यांनी
 दिला. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे १८ आमदार होते. त्यापैकी १२ जण भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्याकडे पाच आमदार बाकी आहेत. त्यातील कितीजण सक्रिय आहे असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी केला. आमदारांना स्वतःकडे ठेवण्याची ताकद नाही. त्यामुळेच काँग्रेस हा आमदार तयार करून त्याचा इतर पक्षांना पुरवठा करणारी फॅक्टरी बनली आहे.

प्रदेश काँग्रेसचे गोवा प्रभारी हे कर्नाटकचे असून म्हादईचे पाणी वळविण्यासाठी यापूर्वी त्यांनी प्रयत्न केले होते. एकिकडे गोव्यातील काँग्रेस म्हादईचे पाणी वळविण्यास विरोध दाखवत आहे तर दुसरीकडे त्यांचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे म्हादईबाबत ब्र सुद्धा काढत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचा दुटप्पीपणा यावरून दिसून येतो. काँग्रेसमध्ये उरलेल्या आमदारांमध्ये समन्वय नाही त्यामुळेच लोकांनी अधिक आमदार निवडून दिले तरी सरकार करता आले नाही. तत्कालिन काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी सरकार घडविताना गोवा फॉरवर्डचा पाठिंबा न घेता मोठी चूक केल्याचे कबूल केले होते, असे सरदेसाई म्हणाले. 

मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचविण्यासाठी काँग्रेसमधून आयात केलेल्या आमदारांचे गुलाम बनले आहेत. मडगाव पालिकेमध्ये ‘सेंटीग’ आहे. भाजप सरकारही काँग्रेस आमदारांची कामे करत आहे. सरकारच्या विरोधात ते वरवर आरोप करत असले तरी मुख्यमंत्र्यांशी त्यांचे अंतर्गत संगनमत आहे असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाने सहभागी चूक केली नव्हती. ते होते तोपर्यंत सर्व काही सुरळीत होते. त्यांच्या निधनानंतर भाजप सरकारमध्ये अनेक बदल झाले.

सरकारमधून गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आमदारांना बाहेर काढण्यापूर्वी पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने स्वतःहूनच बाहेर पडायला हवे होते ते केले नाही ही मोठी चूक होती. या चुकीबद्दल गोवा फॉरवर्डने लोकांची माफी मागितली आहे. यापुढे अशी चूक केली जाणार नाही. राज्यात प्रादेशिक पक्षाचेच सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे. पक्षबदलू आमदारांविरुद्ध न्याय अजूनही मिळत नाही त्यामुळे न्यायालयातूनच मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com