गोवा विधानसभा निवडणुकीतून काँग्रेसमुक्त भारताचा प्रारंभ

राजकीय घडामोडी: भाजपचे तृणमूलच्या सहकार्याने ‘खेला होबे’!
गोवा विधानसभा निवडणुकीतून काँग्रेसमुक्त भारताचा प्रारंभ
Goa PoliticsDainik Gomantak

पणजी: चार महिन्यांनंतर होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीतून (Goa Assembly Election) काँग्रेसमुक्त (Congress) भारताचा प्रारंभ भाजप(BJP) तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सहकार्याने करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने राजकीय ‘खेला होबे’ होईल.

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गोव्यात ना भाजप, ना काँग्रेस अशी तृतीय आघाडी होऊ शकते अशा वातावरणाची निर्मिती होऊ लागली आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी त्याच अनुषंगाने युतीचे भिजत घोंगडे पुढे रेटले आहे. वास्तवात आतापर्यंत युती, आघाडी स्थापन करून प्रचाराला जोरदार प्रारंभ व्हायला हवा होता, परंतु तशी चिन्हे नाहीत.

Goa Politics
Goa Election 2022: राजकीय पक्षांची तोंडाची बॅटिंग सुरु...

बदलत्या राजकारणात विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, सुदिन ढवळीकर, रवी नाईक हे भविष्यात काँग्रेस, भाजपविरोधी तृतीय आघाडी झाल्यास महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता दिसते. चौघेही फालेरो यांचे जिगरी दोस्त नसले तरी मित्र आहेत, शत्रू नाहीत. त्यामुळे तृणमूलचा हात धरूनच ते काँग्रेस, भाजपविरोधी वातावरण गतिमान होण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या बाजूने आम आदमी पक्ष राज्यात काँग्रेस, भाजपविरोधात आक्रमक होऊ लागला असून म. गो. पक्षानेही भाजपबरोबर जाणे आता नकोच, असा सूर लावला आहे. शिवसेनेचे राज्य प्रभारी खासदार संजय राऊत यांनी राज्यात येऊन काँग्रेस, भाजपविरोधी राग आळवला हे विसरता कामा नये. अशा परिस्थितीत तृणमूल काँग्रेस, मगोप, शिवसेना, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिकतेतून उभारलेले राजकीय पक्ष एकत्र येण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक असू शकत नाही. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी वाढदिवसाच्या जाहिरातीतून गवतातल्या फुलांची पखरण करून तृणमूलचे व्यासपीठ आपल्यासाठी खुले होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.

आमदार रोहन खंवटे यांचा कलही त्यांना व त्यांच्या बंधूंना उमेदवारी मिळाल्यास तृणमूलकडे झुकू शकतो. तृणमूल काँग्रेस भाजपची नव्हे काँग्रेसचीच मते फोडणार आहे हे प्रदेश काँग्रेसाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे विधान अर्थपूर्ण आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी तृणमूल म्हणजे काँग्रेसने राज्यात आणलेले विकतचे श्राध्द आहे अशी टीका केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत उत्तरेकडील राजकारणाला महत्त्व येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल उत्तर भारतातील नेते आहेत. केजरीवाल, ममतादीदी यांना हाताशी धरूनच भाजप, काँग्रेसविरोधी राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना खेळणार आहेत. त्यात भाजपपेक्षा नुकसान अधिक होणार आहे ते काँग्रेसचे. भाजपलाही तृणमूल काँग्रेस आपले नव्हे, तर काँग्रेसची अधिक हानी करू शकते याची कल्पना आहे.

Goa Politics
Goa Elections: भाजपमध्‍ये सुंदोपसुंदीचा धोका

फालेरोंच्या खेळीमुळे राजकारणाला कलाटणी शक्य

भाजपने उमेदवारी नाकारल्यास आमदार एलिना साल्ढाणा, कार्लुस आल्मेदा, विल्फ्रेड डिसा, क्लाफास डायस, फ्रान्सिस सिल्वेरा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज हेही फालेरो यांच्या तृणमूलची वाट धरण्याची शक्यता आहे. आमदार चर्चिल आलेमाव, माजी आमदार जुझे फिलीप डिसोझा युतीतून तृणमूलबरोबर असू शकतात. फालेरो काँग्रेसला रामराम ठोकून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये अलीकडेच सामील झाल्यानंतर त्यांची राजकीय खेळी आजवरच्या गोव्याच्या तसेच देशव्यापी राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते याची जाणीव काँग्रेसला झालेली आहे.

तृणमूल काँग्रेसकडे वाढता कल

कुटुंबात दोन उमेदवाऱ्या मिळाव्यात म्हणून पाठपुरावा करणारे भाजपमधील मायकल लोबो, आतानासियो ऊर्फ बाबूश मोन्सेरात, विश्वजित राणे यांनाही तृणमूलचे द्वार उघडले जाऊ शकते. उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर व मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनाही तृणमूल काँग्रेसमध्ये नेण्याचे प्रयत्न होऊ शकतात. सुभाष फळदेसाई, दामोदर नाईक, सुभाष शिरोडकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस तसेच अन्य काही भाजप आमदार यांनाही तृणमूलचे गवतातील फूलच प्रिय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

स्वप्नपूर्तीसाठी राजकारण

काँग्रेसला गोव्यातून मुक्त करायचे असेल, तर काँग्रेसच्या हुकमी एक्क्यांना भाजपमध्ये डेरेदाखल करण्याचे राजकारण लवकरच खेळले जाऊ शकते. एकदा हुकमी एक्के भाजपात गेले की निवडणुकीत काँग्रेसने आवाज केला तरी तो अत्यंत कमी प्रमाणात घुमू शकतो, निवडणुकीनंतर तो निकामी केला जाऊ शकतो आणि तेथूनच गोव्यातून भाजपचे काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी राजकारण सुरू होऊ शकते.

Related Stories

No stories found.