कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दिला दुजोरा

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांना राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत, अशा शब्दांत गिरीश चोडणकर यांनी आपण राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमदेवारांना आलेल्या अपयशाची जबाबदारी घेत मी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांना राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत, अशा शब्दांत गिरीश चोडणकर यांनी आपण राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

ते म्हणाले, काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी माझी भेट घेतली. त्यांनी राजीनाम्याचा फेरविचार करा असे मला सुचवले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. गेले दोन दिवस मी मोबाईल बंद ठेवला आहे. अनेक कार्यकर्ते मी राजीनामा का दिला अशी विचारणा करत आहेत. त्यांना मी काय सांगू. आता एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेत मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. येत्या पालिका निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला कोणी मोठे यश मिळवून देत असे,ल तर त्‍याला माझ्या शुभेच्छा. मी आता काहीकाळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मी कॉंग्रेसचा सच्चा सैनिक असल्याने इतरत्र कुठे राजकीय सोयीसाठी जाण्याचा प्रश्न नाही. मी पक्षासोबतच आहे आणि पक्ष यापुढे देईल ती भूमिका मी पार पाडणार आहे.

दरम्यान, खात्रीलायकरीत्‍या मिळालेल्या माहितीनुसार, चोडणकर यांना ज्येष्ठ नेते सहकार्य करत नव्हते. विशेषतः संघटनात्मक कामांसाठी आर्थिक मदत कोणाकडूनही मिळत नव्हती. चोडणकर यांनी पुढे आणलेले युवा नेते पदरमोड करून आंदोलने करत होते. त्यालाही मर्यादा होत्‍या. संघटनात्मक काम पुढे न्यावे असे चोडणकर यांना राज्य प्रभारींसह सर्वचजण सुचवत होते. मात्र, एखादा मेळावा घ्यावा असे म्हटले तरी त्यासाठी येणारा किमान खर्च भागवण्याची तरतूद होत नव्हती. पक्षाचे हितचिंतक बरेच आहेत, पण त्यांच्याही सध्याच्‍या काळात असलेल्या मर्यादा जाणवत होत्या. त्याचमुळे चोडणकर यांनी फार पूर्वीच थांबण्याचे ठरवले होते. आता त्यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी केली.

आणखी वाचा:

गोवा मुक्तिसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींनीची मुख्यमंत्री झाली आठवण -

संबंधित बातम्या