वीज बिलांत सूट द्या, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन; काँग्रेसचा सरकारला इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

पणजीत काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संकल्प आमोणकर म्हणाले की, वीज ग्राहकांना टाळेबंदीच्या काळात वाढीव बिले आली आहेत हे वारंवार सरकारला तसेच वीजमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करूनही ते मान्य करण्यास तयार नव्हते त्यामुळे राज्यभर त्यासाठी आंदोलन छेडण्यात आले.

पणजी: कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून वीज ग्राहकांना भरमसाट व त्रुटीची वीज बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे यासंदर्भात वीजमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार या वीज बिलांमध्ये सूट द्यावी. त्यांनी दिलेले हे आश्‍वासन न पाळल्यास काँग्रेसतर्फे राज्यभर पुन्हा रस्त्यावर उतरून अगोदरपेक्षा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सरकारला दिला आहे. वीजमंत्र्यांनी पुढील मंत्रिमंडळात वीज बिलांत सूट देण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्याची ग्वाही काँग्रेसला दिली आहे. 

पणजीत काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संकल्प आमोणकर म्हणाले की, वीज ग्राहकांना टाळेबंदीच्या काळात वाढीव बिले आली आहेत हे वारंवार सरकारला तसेच वीजमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करूनही ते मान्य करण्यास तयार नव्हते त्यामुळे राज्यभर त्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. सरकारसमोर चार मागण्या ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये एप्रिल व मे या दोन महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावीत किंवा टाळेबंदीच्या काळातील सर्व वीज बिलांवर ५० टक्के सूट दिली जावी किंवा फेब्रुवारी २०२० मध्ये जे वीज बिल आकारण्यात आले आहे त्यानुसार आतापर्यंत वीज बिले आकारली जावीत किंवा ज्यांची बिले पाच हजारांवर आली आहेत त्यांनी ती माफ करावीत व पाच हजारांवर असलेल्या बिलांमध्ये ५० टक्के सूट दिली जावी. यापैकी कोणतीही मागणी मान्य करावी याबाबत काँग्रेस ठाम आहे. यावेळी काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर, ऊर्फान मुल्ला व जनार्दन भंडारी उपस्थित होते. 

काँग्रेसने वीज बिलांमध्ये सूट देण्याची मागणी लावून धरल्यानंतर सरकारने त्यात सूट देण्याची घोषणा केली. बिलांमध्ये ५० टक्के सूट मिळेल असा गैरसमज वीज बिल ग्राहकांचा झाला. मात्र ही घोषणा लोकांची दिशाभूल करणारी होती. बिलामधील निश्‍चित शुल्कात (फिक्स्ड चार्जीस) ५० टक्के सूट देण्याचा आदेश काढला. मात्र हे शुल्क सिंगल फेजसाठी २५ रुपये तर थ्री फेजसाठी ६० रुपये आहे. त्यामुळे जास्तीत बिलामध्ये ३० रुपयेच सूट मिळणार होती. ही बाब लोकांच्या काँग्रेसने निदर्शनास आणून दिल्यावर सरकारडून झालेल्या फसवणुकीचा लोकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनात लोक सहभागी होऊन मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. 

कुडचडे येथील वीज कार्यालयावर वीज बिलांसंदर्भात मोर्चा नेण्यात आला तेव्हा पोलिसांनी तो उधळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र हे आंदोलन लोकांच्या हितासाठी असल्याने काँग्रेस कार्यकर्ते तेथेच थांबून राहिले. अखेर वीजमंत्र्यांनी कुडचडे येथील वीज कार्यालयात येण्याचे मान्य केले. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाबरोबर त्यांनी चर्चा केली. वीज बिलांमध्ये कुठे त्रुटी आहेत या दाखवून द्याव्यात अशी विचारणा केली. या त्रुटी व वाढीव बिले अनेकांना देण्यात आली आहेत त्यामुळे त्यापैकी एक बिल दाखवल्यावर तेही चक्रावून गेले व हे बिल देणाऱ्या मीटर रिडरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. बिलांमध्ये सूट देण्याचा प्रयत्न पुढील मंत्रिमंडळावेळी प्रस्ताव मांडून केला जाईल किंवा एखादी योजना आणली जाईल असे आश्‍वासन वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिले. 

वीजमंत्र्यांच्या अहंकाराचा निषेध 
वीज बिलांसंदर्भात चर्चा करताना वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या घमेंड व अहंकाराचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. चर्चेवेळी मंत्र्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर आवाज वाढवल्याने त्यांचा हा आवाज भाजप घमेंडचा होता. काँग्रेसनेही आवाज वाढविला मात्र तो सामान्य जनतेच्या समस्या घेऊन आलेल्यांचा होता. टाळेबंदीत चुकीची बिले ज्यांना देण्यात आली आहेत त्यांना १०० टक्के बिल वीजमंत्री माफ करणार का असे आवाहन अमरनाथ पणजीकर यांनी दिले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या