पणजीत काँग्रेस नेत्यांची मध्यरात्री धरपकड!

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

 आयएसएल फुटबॉल स्पर्धेत वाहने, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन वीज व्यवस्था आदी कामे स्थानिकांनाच द्यावी यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

पणजी : आयएसएल फुटबॉल स्पर्धेत वाहने, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन वीज व्यवस्था आदी कामे स्थानिकांनाच द्यावी यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या नेत्यांनी आज पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. सोमवारपर्यंत सर्व वाहने स्थानिक वाहतूकदारांकडून न घेतल्यास आंदोलनावर ठाम आहोत असे त्यांनी नमूद केले.

कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी स्थानिकांना कामे द्या अन्यथा स्पर्धा होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आणि तसे निवेदन आयोजक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. नागोवा येथे खेळाडूंना घेऊन जाणारी परराज्यात नोंदणी केलेली बस या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने अडवल्यानंतर आयोजकांनी कॉंग्रेस कार्यालयात येऊन स्थानिकांना काम देण्याचे मान्य केले होते. 

पणजीकर यांनी सांगितले, की स्थानिक व्यावसायिकांना या स्पर्धेच्या निमित्ताने काम श्रेय कॉंग्रेसला मिळते असे दिसल्यावर सरकारी यंत्रणा गतिमान झाली आणि आम्हाला मध्यरात्री पकडण्याचा प्रयत्न झाला. आज आम्ही पोलिस महासंचालकांना भेटलो आणि जे काही प्रश्न विचारायचे असतील ते दिवसा विचारा, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पर्धा उधळण्याचा इशारा दिल्याने आम्हाला ताब्‍यात घेण्याचा आदेश दिल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यांनी आम्हाला स्पर्धा उधळणार नाही असे लिहून देण्यास सांगितले. आम्ही तसे करण्यास नकार दिला. त्यांना सांगितले आयोजकांनी वीज आपत्तकालीन व्यवस्था, सुरक्षा व्‍यवस्था अशी कामे स्थानिकांना दिली आहे. काही वाहनेही त्यांनी स्थानिका पातळीवर घेतली असून उर्वरित वाहने सोमवारी घेऊ असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही सोमवारपर्यंत आंदोलन करणार नाही.

आणखी वाचा:

आगामी निवडणूकीत गोवा कॉग्रेस देणार नव्या दमाच्या नेत्यांना संधी - 

संबंधित बातम्या