लोहमार्गाचे दुपदरीकरण त्वरित बंद करा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

मुरगाव बंदरातून कर्नाटकातील उद्योगांसाठी लागणाऱ्या कोळसा वाहतुकीसाठी पर्यावरणाचा नाश करून तसेच गोव्यातील वनसंपदा नष्ट करून हाती घेण्यात आलेले वास्को ते हॉस्पेट लोहमार्गाचे दुपदरीकरण दक्षिण पश्चिम रेल्वेने त्वरित बंद करावे या मागणीसाठी कॉंग्रेसने हुबळीत निदर्शने केली.

पणजी : मुरगाव बंदरातून कर्नाटकातील उद्योगांसाठी लागणाऱ्या कोळसा वाहतुकीसाठी पर्यावरणाचा नाश करून तसेच गोव्यातील वनसंपदा नष्ट करून हाती घेण्यात आलेले वास्को ते हॉस्पेट लोहमार्गाचे दुपदरीकरण दक्षिण पश्चिम रेल्वेने त्वरित बंद करावे या मागणीसाठी कॉंग्रेसने हुबळीत निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. त्यांनी नंतर दक्षिण पश्चिम रेल्वेचे अतिरीक्त सरव्यवस्थापक प्रशांत कुमार मिश्रा यांना निवेदनही सादर केले.

या मागणीसाठी कार्यकर्त्यांसह सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळ गोव्यातील लोक कर्नाटकात येऊन का घोषणाबाजी करतात ते पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. एवढ्या मोठ्या संख्येने घोषणा दिल्या जाऊ लागल्याने स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेत तेथे धाव घेतली. गोव्यातील विरोधी पक्षनेते आंदोलन करत असल्याचे समजताच पोलिसांनी सहकार्य केले आणि अतिरीक्त सरव्यवस्थापकांच्या भेटीची वेळ निश्चित केली. या भेटीदरम्यान चोडणकर व कामत यांनी दुपदरीकरण कामास गोव्यात प्रचंड विरोध होत असल्याचे सांगून लोक आता रस्त्यावर उतरल्याचे नमूद केले. रेल्वे विकास निगमने त्वरित हे काम बंद न केल्यास गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी रेल्वे सरव्यवस्थापकांना सांगितले व ताबडतोब काम बंद करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. 

काँग्रेसचे नेते आज सकाळी हुबळी येथे पोचल्यानंतर त्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कार्यालयासमोर धरणे धरले. ‘आम्हाला नको, आम्हाला नको, काळा कोळसा आम्हाला नको’, ‘आमचे एकच लक्ष्य कोळसा नाकारा’, ‘बंद करा, बंद करा, लोहमार्ग दुपदरीकरण बंद करा’ असे अनेक फलक हाती घेऊन काँग्रेसचे संकल्प आमोणकर, अमरनाथ पणजीकर, जर्नादन भांडारी, जोसेफ डायस, विजय भिके, रोयला फर्नांडिस, डेनिका आल्मेदा, दामोदर शिरोडकर, वरद म्हार्दोळकर, सचिन परब, दशरथ मांद्रेकर, अभिजीत देसाई, मेघश्याम राऊत, ग्लेन काब्राल, देवसुरभी यदुवंशी व इतरांनी  जोरदार निदर्शने केली. 
दक्षिण पश्चिम रेल्वेचे अतिरीक्त सरव्यवस्थापक प्रशांत कुमार मिश्रा यांनी यावेळी शिष्टमंडळास त्यांनी मांडलेल्या प्रश्नावर आपल्या वरिष्टांकडे बोलून योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. गोव्याचा निसर्ग हे एक वरदान असून त्याचे रक्षण करणे सर्वांचेच कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. 

काँग्रेस पक्ष गोव्याची अस्मिता व पर्यावरणाचे रक्षण करण्यास वचनबद्द असून केंद्र सरकारच्या प्रयत्नांना आम्ही कदापी सफल होऊ देणार नाही, असे कामत यांनी यावेळी सांगितले. रेल्वे अधिकारीणीने आताच शहाणपण दाखवून कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येणारे लोहमार्ग दुपदरीकरण काम बंद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा  दिला. 
चोडणकर यांनी भाजप सरकार लोकभावनांचा आदर न करता केवळ भाजपला जवळ असलेल्या उद्योजकांच्या फायद्यासाठी गोव्याचे कोळसा केंद्र करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करुन, सरकारने हे काम ताबडतोब बंद करण्याचा इशारा दिला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांदर व दवर्ली येथे तसेच मडगावच्या लोहिया मैदानावर झालेल्या जाहीर सभेत आपल्या शक्तीप्रदर्शनाची झलक दाखवली असून यापुढे आपले विरोध प्रदर्शन उग्र होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

कोळसा विरोधी आंदोलन तसेच मोले वाचवा आंदोलनात आज अनेक मान्यवरांचा पाठिंबा आम्हाला मिळत असून सरकारने भानावर येऊन पर्यावरणाचा नाश करणारे हे प्रकल्प रद्द करावेत. रेल्वे सरव्यवस्थापकांच्या कचेरीत गोव्यातील दुधसागराचे छायाचित्र असून तो  दुधसागर  जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता रेल्वेची आहे, असे रॉयला फर्नांडिस यांनी सांगीतले.  कोळसा वाहतुकीने आज संपूर्ण मुरगाव तालुका प्रदुषणाच्या विळख्यात आला असून लोकांना जगणे मुश्कील झाल्याचे संकल्प आमोणकर यांनी यावेळी सांगितले व सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी बंद न केल्यास लोकांना श्वास घेणे कठीण होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी जोसेफ डायस, विजय भिके, जनार्दन भंडारी यांची कोळसा वाहतुक व रेल्वे दुपदरीकरणास विरोध करणारी भाषणे झाली.

संबंधित बातम्या