बदनामीप्रकरणी काँग्रेस सदस्या प्रतिभा बोरकर यांनी केली पोलिसात तक्रार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

गोवा प्रदेश काँग्रेस कार्यालयातील एका पत्रकार परिषदेचे छायाचित्र ज्यामध्ये तक्रारदार प्रतिभा बोरकर यांचीही उपस्थिती आहे त्याचा वापर करून सोशल मिडियावरून तो व्हायरल करण्यात आला व त्याला ट्विटरवर ‘नक्षल भाभी’ यासारख्या खोट्या, बदनामीकारक आणि अवमानकारक टॅग लाईनद्वारे प्रसारित केले गेले होते.

पणजी- हाथरस प्रकरणाशी संदर्भ लावून बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या सदस्य तसेच गोवा प्रदेश काँग्रेसच्या प्रसार माध्यम प्रमुख प्रतिभा बोरकर यांनी सायबर कक्षाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा त्वरित तपास करून ही बदनामी केलेल्यांना गजाआड करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसतर्फे पोलिस महासंचालकांना भेटून करण्यात आली. 

गोवा प्रदेश काँग्रेस कार्यालयातील एका पत्रकार परिषदेचे छायाचित्र ज्यामध्ये तक्रारदार प्रतिभा बोरकर यांचीही उपस्थिती आहे त्याचा वापर करून सोशल मिडियावरून तो व्हायरल करण्यात आला व त्याला ट्विटरवर ‘नक्षल भाभी’ यासारख्या खोट्या, बदनामीकारक आणि अवमानकारक टॅग लाईनद्वारे प्रसारित केले गेले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल गोवा प्रदेश काँग्रेसने घेतली आहे. छायाचित्र जे व्हायरल करून टॅग करण्यात आले आहे त्याच्याशी तक्रारदाराचा काहीच संबंध नाही. हे छायाचित्र सप्टेंबर २०१९ मधील आहे व त्याचा गैरवापर करण्यात आला आहे. तक्रारदारची बदनामी करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले आहे. हे छायाचित्रे फेसबूकचा उपयोग करून घेण्यात आले आहे व ते टॅग करून समाजात तक्रारदाराची तसेच पक्षाची बदनामी केली आहे. या छायाचित्रामुळे पक्षाचे तिच्या नावलौकिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करून तपासकाम सुरू करावे व या प्रकरणामागे जी व्यक्ती आहे त्याचा पर्दाफाश करावा असे तक्रारीत म्हटले आहे.

भाजपचा महिलांबाबतचा अनादर हाथरस प्रकरणाने उघड झाला आहे. त्यामुळेच महिलांना बदनाम करण्याच्या उद्देशाने हाथरस की भाभी असे ट्विटरवरून तक्रारदारची बदनामी करण्यामागे त्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची खोटी व बदनामी करणारे ट्विट करून भाजप सरकार किती खालच्या थराला पोहचले आहे हे स्पष्ट होते अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
 

संबंधित बातम्या