काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मध्यरात्रीच जावडेकरांना घेरण्याचा प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

जावडेकर राहत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांना काल मध्यरात्री पोलिसांनी अटक केली.​

पणजी- केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गोवा दौरा काँग्रेसच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेला आहे. जावडेकर राहत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांना काल मध्यरात्री पोलिसांनी अटक केली.

काँग्रेसच्या या नेत्यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. काँग्रेसच्या या नेत्यांची मुक्तता न केल्यास पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसच्या नेत्यांची पोलिसांनी मुक्तता केल्यानंतर जावडेकर यांच्या प्रतिमेचे दहन काँग्रेस हाउस या काँग्रेसच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले.

या वादात सत्ताधारी भाजपने उडी घेतली. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लुटारू आणि चोर फिरतात. राजकीय नेते लपून-छपून फिरत नाहीत, असा हल्ला आज केला. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्यात काहीच गैर नाही, असे सांगितले.

पणजीत हा वाद रंगला असतानाच पणजीपासून आठ किलोमीटर अंतरावरील सोडून बेटावर जावडेकर हे शेतकऱ्यांची संवाद साधत होते. केंद्र सरकारने मंजूर केलेली विधेयके ही शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. या विषयावर जावडेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. जावडेकर हे पर्यावरण मंत्री असल्यामुळे म्हादई नदीचे पाणी कर्नाटक पळवत असताना पर्यावरण दाखला नसलेल्या या प्रकल्पाबाबत केंद्र सरकार काहीच का करत नाही, अशी विचारणा करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी चालवलेला होता. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हॉटेल लॉबीमध्ये ड्रामा केल्यामुळे जावडेकर यांचा दौरा चर्चेचा ठरला आहे.

संबंधित बातम्या