लूट करण्यासाठी सरकारने दिली सनबर्न महोत्सवाला परवानगी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

राज्यात कोरोना संसर्गाचे सावट असताना सनबर्न महोत्सव आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पणजीतील एका तारांकित हॉटेलात ही परिषद होती, त्याच्या बाहेर काँग्रेस पक्षाने निदर्शने केली व गोव्यात हा महोत्सव रद्द करण्याची मागणी केली

पणजी: राज्यात कोरोना संसर्गाचे सावट असताना सनबर्न महोत्सव आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पणजीतील एका तारांकित हॉटेलात ही परिषद होती, त्याच्या बाहेर काँग्रेस पक्षाने निदर्शने केली व गोव्यात हा महोत्सव रद्द करण्याची मागणी केली. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांविरोधात घोषणा देत जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे, तोपर्यंत तो होऊ दिला जाणार नाही. त्याचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडला जाईल, असा इशारा काँग्रेसने आयोजकांना तसेच पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना दिला.  

या काँग्रेसच्या निदर्शन कार्यक्रमात पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, जनार्दन भंडारी, युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच सांताक्रुझचे काँग्रेस नेते रुडॉल्फ फर्नांडिस तसेच महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आयोजकांनी सनबर्न महोत्सव होणार नाही अशी ग्वाही देण्याची मागणी काँग्रेसने केली होती. त्यासाठी ते आयोजकांची वाट पाहत प्रवेशद्वारावर जमा झाले होते. 

यावेळी संकल्प आमोणकर म्हणाले, की राज्यात कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नाही. सरकार कोरोना संसर्ग प्रमाण रोखण्यास सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या उदारनिर्वाहासाठी सरकारकडून काहीच मदत होत नाही. मात्र, सनबर्न महोत्सवासाठी सरकार परवाने देत आहे. या महोत्सवासाठी देश - विदेशातून पर्यटक उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सनबर्न महोत्सव राज्यातील कोरोना स्थितीनुसार आयोजन करण्याचा निर्णय घेतला जाईल असे पर्सेप्ट कंपनीचे अधिकारी सांगत असले
तरी त्यांची ही लोकांची दिशाभूल करणारी चाल आहे. या महोत्सवासाठीच्या ऑनलाईन तिकिट विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे विक्री झालेली तिकिटे तसेच उभारण्यात आलेला साधनसुविधेवरील खर्च आयोजक वाया जाऊ देणार आहेत का? असा प्रश्‍न जनार्दन भंडारी यांनी केला. जोपर्यंत राज्यात कोरोनाचे संकट आहे व स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत सनबर्न महोत्सवाचे गोव्यात आयोजन नको आहे. हा महोत्सव आयोजित करण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेसतर्फे तो हाणून पाडला जाईल, असे ते म्हणाले. 
गेले सात महिने गोमंतकीय कोरोना महामारीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक कुटुंबे कोरोनाच्या महामारीमुळे उद्‍ध्वस्त झाली आहेत.

अनेकजण बेरोजगार झाले आहेत. रुग्णांचे प्रमाण कमी झाले म्हणून सरकारने सनबर्न महोत्सवाला परवाना देऊन धोका पत्करला आहे. स्वतःचे खिशे भरण्यासाठी हा परवाना दिला आहे. फक्त दहा हजार व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल ही आयोजकांनी दिलेली माहिती फसवणूक करणारी आहे. सनबर्न महोत्सव देशातच नव्हे, तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे लाखो लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. हे कोरोनाबाधित पर्यटक गोव्यात येतील आणि गोमंतकीयांना त्याचा संसर्ग देऊन जातील अशी भीती काँग्रेसचे नेते रुडॉल्फ फर्नांडिस यांनी व्यक्त केली. सरकारने लूट करण्यासाठी सनबर्न महोत्सवाला परवानगी दिली आहे. सनबर्न महोत्सव ज्या ठिकाणी होईल तेथे जाऊन तो उदध्वस्त केला जाईल. आयोजकांबरोबरच पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनाही गोमंतकीय जनता व काँग्रेस योग्य धडा शिकविल. या महोत्सवातून रोजगार उपलब्ध होतो असे आयोजकांनी केलेले स्पष्टीकरण गोमंतकीयांची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी केला.

संबंधित बातम्या