काँग्रेसचा वीज बिलात कपातीच्या मागणीसाठी मोर्चा;  नीलेश काब्राल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

काँग्रेसचा वीज बिलात कपातीच्या मागणीसाठी मोर्चा;  नीलेश काब्राल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
Congress protest against electricity bill in Curchorem

कुडचडे: कोरोना महामारी काळात वीज बिलात झालेली वाढ कमी करावी, या मागणीसाठी कुडचडे, सावर्डे आणि सांगे गट काँग्रेस पक्षाने कुडचडे वीज कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी अडविला आणि पुतळा पळविल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

निवेदन सादर करण्याची तयारी केली असताना मोर्चा अडविण्यासाठी कुडचडे बागायतदार यार्ड ते वीज कार्यालय परिसराला पोलिस तैनात करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणलेला पुतळा पोलिसांनी काढून घेतल्याने गोंधळ झाला.

उपअधीक्षक किरण पोडवळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अद्याप १४४ कलम लागू असून गर्दी करता येणार नसल्याचे सांगतात भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने कसे काय एकत्र येऊ शकतात, त्यांना हा नियम लागू होत नाही, का? असे प्रश्‍न विचारण्यात आले. मोर्चेकरी संतप्त झाल्यामुळे केपेचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी पोलिस फौजफाटा घेऊन मोर्चा कार्यालयापर्यंत नेण्यास अनुमती दिली. 

यापूर्वी वीजमंत्री निलेश काब्राल यांनी भाजपा कार्यकर्त्यांना गडबड न करण्याची सूचना देऊन ते वीज कार्यालयात गेले. दरम्यान, काँग्रेसचे पाच जणांचे शिष्टमंडळ आत सोडण्यात आले.

या काँग्रेस शिष्टमंडळात  काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, कुडचडे अध्यक्ष पुष्कल सावंत, हर्षद गावस देसाई, अभिजित देसाई, अली शेख यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने वीजमंत्री निलेश काब्राल यांच्याशी तास भर चर्चा केली. शिष्टमंडळाने आपली भूमिका मांडली, त्यावर उत्तर देताना वीजमंत्री आपली बाजू मांडताना खुद्द संकल्प आमोणकर यांची गेल्या तीन वर्षाची बिले सादर करून बिलात कशी वाढ झाली? असा सवाल केला. 

ते महामारी काळात वीज बिल कमी आल्याचे स्पष्टीकरण देत होते. त्यावर संकल्प यांनी आपले कुटुंब एकत्र होते. जानेवारीपासून भाऊ वेगळ्या घरात राहायला गेल्याने महामारी काळात आपल्या घरात केवळ आपले कुटुंब शिल्लक राहिल्याने वीजेचा वापर कमी झाला असल्याचे स्पष्टीकरण संकल्प यांनी स्पष्ट केले. वीज वाढ झाली नसल्याची बाजू मांडणाऱ्या वीजमंत्र्यांना संकल्प यांनी काणकोण येथे वीज ग्राहकाला दोन महिन्याचे वीज बिल २४००, तर दीड महिन्याचे १४००० कसे आले असे विचारताच आपण चौकशी करून दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले. 

सरचिटणीस अमरनाथ पणजीकर म्हणाले, महामारी काळातील एप्रिल व मे महिन्याच्या वीज बिलात कपात करा, किंवा माफ करा, आम्ही वेगळी योजना करण्याची मागणी करीत नसून केवळ दोन महिन्याचे बिल कपात करण्याची मागणी करीत आहोत, असे सांगितले.

नेत्रावळीचे उपसरपंच अभिजित देसाई, हर्षद गावस देसाई, कुडचडे गट अध्यक्ष पुष्कल सावंत. सावर्डे अध्यक्ष श्याम भंडारी, अली शेख, रजनीकांत नाईक, ट्रिबेलो सौझा, इरफान किल्लेदार, उबीद खान, इतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. साठ, सत्तर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा हाताळण्यासाठी कुडचडे, सांगे,  केपे, फातोर्डा, काणकोण, कुंकळी या भागातील पोलीस फोर्स आणण्यात आला होता. 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा
वीज मंत्री निलेश काब्राल म्हणाले, वीज बिलात चुकून वाढ झाल्यास दुरुस्ती करून देऊ, पण मुद्दाम चूक करून दिल्यास त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यापुढे चूक घडल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. आणि काँग्रेस पक्ष मागणी करीत असलेल्या संदर्भात आपण हा विषय मंत्री मंडळाच्या बैठकीत सादर करणार आहे, खास योजना बनविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलणी करणार आहे, असे स्पष्ट केले.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com