‘गोवा अगेन्स्ट मरीना’तर्फे ‘नावशी मरीना’ला प्रखर विरोध

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

नावशी येथील मरीना प्रकल्पाविरोधात ‘गोवा अगेन्स्ट मरीना’तर्फे आज शिरदोण येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिती होऊ न देण्याचा निर्धार करण्‍यात आला. तसेच आंदोलन अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पणजी  : नावशी येथील मरीना प्रकल्पाविरोधात ‘गोवा अगेन्स्ट मरीना’तर्फे आज शिरदोण येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिती होऊ न देण्याचा निर्धार करण्‍यात आला. तसेच आंदोलन अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांतआंद्रेचे आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा यांनी सभेला उपस्थिती लावून या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. मात्र, लोकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकल्पविरोधाला पाठिंबा देण्यास आलेल्या काही नेत्यांमध्ये मते मांडताना आरोप - प्रत्यारोप झाल्याने व उशीरही झाल्याने सभा आटोपण्यात आली. राज्यात विविध प्रकल्पांना विरोध होत असल्याने सर्वांनी एकत्र येऊन राज्यात एक दिवस गोवा बंद ठेवण्याचा विचारही पुढे आला. 

नावशी मरीना प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय धोक्यात असल्याने नावाशी गावाबरोबरच त्याच्या आजुबाजूला असलेल्या ओडशेल, काकरा, दोनापावल, शिरदोण या भागातील लोक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते. याव्यतिरिक्त काँग्रेस विधिमंडळ नेते व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सांताक्रुझचे रुडॉल्फ फर्नांडिस, नावशी पंचायत मंडळ, पर्यावरणप्रेमी प्रा. प्रजल साखरदांडे, सामाजिक कार्यकर्ते आर्थूर डिसोझा, ॲड. सुरेश पालकर, प्रा. रामराव वाघ, अरुणा वाघ, सभेचे आयोजक रामा काणकोणकर यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. 

सभेतच आरोप - प्रत्‍यारोप
हा प्रकल्प होऊ नये यासाठी आयोजकांनी उपस्थित राहिलेल्या सिल्वेरा यांना मुख्‍यमंत्र्यांबरोबर चर्चेची वेळ सांगा व त्याचे आश्‍वासन द्या, असे सांगितले. या सभेवेळी काही नेत्यांनी एकामेकाविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्याने वातावरण तंग झाले होते. आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा हे सभेत बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा लोकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. लोकांनीही घोषणा देत हा मरीना प्रकल्प नावशी गावात नको व सरकारने तो त्वरित रद्द करण्याची मागणी केली. आयोजकांनी मरीना प्रकल्पामुळे ज्या मतदारसंघातील गावांना फटका बसणार आहे त्या सर्व मतदारसंघाच्या आमदारांनाही आमंत्रित केले होते मात्र नावशी हा भाग सांत आंद्रे मतदारसंघात येत असल्याने एकमेव आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा हे उपस्थित राहिले. यावेळी अनेक नेत्यांनी प्रकल्पाला विरोध करणारी मते मांडली तसेच स्थानिक आमदार सिल्वेरा यांच्या दुटप्पीपणाचा पाढाच वाचला.

लोकांची लक्षणीय उपस्‍थिती
मरीना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी काल दुचाकी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला मोठा प्रतिसाद लाभला होता व आज जाहीर सभा ठेवण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते. हा प्रकल्प गेल्या दशकापासून आणण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र तो लोकांच्या विरोधामुळे स्थगित ठेवण्यात आला होता. या प्रकल्पाला सरकारने परवानगी दिली असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त करून त्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. 

साडेचार तास सभा
संध्याकाळी ५ वाजता शिरदोण येथील पंचायतीजवळ सुरू झालेली ही सभा रात्री साडेनऊ वाजले तरी सुरू होती. या सभेला आलेले लोक उशिरापर्यंत बसून होते व आज सभेत काय निर्णय होतो याच्या प्रतीक्षेत होते. मात्र सभेच्या अखेरीस नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू झाल्याने गोंधळ माजला व त्यानंतर आयोजकांनी वातावरण अधिक तापण्यापूर्वीच सभा समाप्त केली. मात्र हा लढा अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

माझाही मरीना प्रकल्‍पाला विरोध : वाघ
आमदार सिल्वेरा यांनी प्रा. रामराव वाघ हे भाजपचे कार्यकर्ते आहेत व ते भाजप नेत्यांचे कान भरतात, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना प्रा. वाघ यांनी सांगितले की, माझा मरीना प्रकल्पाला विरोध आहे व कायम असेल. मी कधीच भाजपबरोबर या विषयावर बोललो नाही व पक्षानेही माझ्या भूमिकेबाबत कधी विचारले नाही. उलट जर भाजप नेत्यांना या प्रकल्‍पाबाबत सांगून तो जर रद्द होत असेल तर बरेच आहे, असा टोमणा त्यांनी आमदार सिल्वेरा यांना हाणला.

मुख्‍यमंत्र्यांबर बैठक निश्‍चित करतो : सिल्‍वेरा
मरीना प्रकल्प होऊ नये यासाठी आयोजकांनी उपस्थित राहिलेल्या सिल्वेरा यांना मुख्‍यमंत्र्यांबरोबर चर्चेची वेळ सांगा व त्याचे आश्‍वासन द्या, असे सांगितले. हा लढा एकजुटीने लढण्याबाबतचे मत आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा यांनी व्यक्त केले. मात्र ‘गोवा अगेन्स्ट मरीना’च्या आंदोलनकर्त्यांनी त्याला नकार दिला. जर मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करण्यास नकार दिला तर तुम्ही (फ्रान्‍सिस सिल्वेरा) भाजप सरकारमधून इतर बाहेर पडणार का? तुम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला तर हाच काय तो विकास? लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते तर भाजपमध्ये प्रवेश करताना मतदारांना विश्‍वासात घेतले होते का? मरीना प्रकल्प किती वेळेत रद्द होईल व तो कधी होईल याचे आश्‍वासन आताच मुख्यमंत्र्यांना फोन लावून द्या, असा धडाका आयोजकांनी लावल्यामुळे ते अडचणीत आले. आयोजकांना त्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्यासाठी माझ्याबरोबर या, पाहिजे तर मी ही बैठक निश्‍चित करून नेतृत्व करतो अशी विनंती केली. मात्र संतप्त झालेले लोक त्यांची विनंती मान्य करण्यास तयार 
नव्हते. 

संबंधित बातम्या