भाजपविरोधात आघाडीची काँग्रेसकडून चाचपणी सुरू

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

विधानसभेतील विरोधकांची एकी निवडणुकीवेळीही कायम ठेवता येईल असे वाटणारा एक गट काँग्रेसमध्ये आहे.

पणजी

विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष बाकी असतानाच युवा नेत्यांना भाजपने प्रवेश देणे सुरू केल्याने काँग्रेसने या हालचालींकडे बारकाईने पाहणे सुरू केले आहे. भाजपविरोधात विरोधी पक्ष आणि अपक्षांची आघाडी उभी राहू शकेल काय याची चाचपणी काँग्रेसकडून सुरू आहे. विधानसभेतील विरोधकांची एकी निवडणुकीवेळीही कायम ठेवता येईल असे वाटणारा एक गट काँग्रेसमध्ये आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीकडे आता प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर लक्ष पुरवणार आहेत. गट समित्यांची फेररचना करत ते प्रत्येक तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कोविड महामारी आटोक्यात आल्यानंतर दौरेही करणार आहेत. निम्म्या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे तत्त्व काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीवेळी अवलंबले होते. मात्र, युवा नेत्यांना यश मिळाले नव्हते. ज्येष्ठ नेते निवडून आले खरे, पण त्यापैकी केवळ पाच वगळता इतर सर्व भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
यामुळे भाजपमध्ये गेलेले नेते परत आले तर काय, ते नेते भाजपमधून बाहेर पडले तर काँग्रेस की अन्य पक्षात जातील याविषयी सध्या आडाखे बांधण्यात येत आहेत. भाजपविरोधकांतील फुटीचा फायदा दरवेळी भाजपला होतो. या मतविभागणीतून भाजपचा उमेदवार निवडून येतो. यासाठी मतांची ही फाटाफूट टाळावी असे काँग्रेसला वाटते. त्यासाठी अशी आघाडी उभी राहते का याकडे काँग्रेसचे लक्ष आहे. मात्र, त्यासाठी अद्याप काँग्रेसकडून पावले मात्र टाकण्यात आलेली नाहीत.

संबंधित बातम्या